मुंबई : विद्यापीठांचे मूळ उद्दिष्ट हे विद्यादान करणे असून नियम, अटी, शर्ती या केवळ दाखला देण्याकरिता असतात याची उच्च न्यायालयाने एका लिंगबदल केलेल्या विद्यार्थ्याला दिलासा देताना अधोरेखीत केले. तसेच, या विद्यार्थ्याला त्याच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी गुणपत्रिकेत महिलांऐवजी पुरुष अशी नोंद करून नव्या नावासह उपलब्ध करून द्यावी, असे आदेश न्यायालयाने एसएनडीटी महिला विद्यापीठाला दिले.

नवे नाव आणि ओळखीसह सुधारित पदवी गुणपत्रिका देण्यास नकार दिल्यानंतर वाणिज्य शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेल्या याचिकाकर्त्याने विद्यापीठाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती रियाझ छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी, २०१४ मध्ये याचिकाकर्त्याने विद्यापीठाकडे सुधारित पदवी गुणपत्रिकेसाठी अर्ज केला होता. तथापि, तो नाकारण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्याच्यावतीने न्यायालयाला देण्यात आली.

त्याने २०१७ मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, याचिकाकर्त्याने पुरूष म्हणून नवी ओळख मिळवण्यासाठी अमेरिकेत जाऊन लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली. त्यानंतर त्याने शाळेचा दाखला, आधारकार्ड पारपत्रावरही नव्या ओळखीनुसार बदलून घेतले. त्यामुळे त्याची सर्व वैद्यकीय कागदपत्रे आणि तपासणी पूर्ण झाली, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.

विद्यापीठाचे म्हणणे काय होते?

आमचे महिला विद्यापीठ आहे. त्यामुळे, पदवी निकाल आणि प्रमाणपत्रावर महिला ऐवजी पुरुष असा बदल करून दिल्यास विद्यापीठाचे मूळ अस्तित्वावर प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका विद्यापीठातर्फे न्यायालयात मांडण्यात आली. न्यायालयाने मात्र नवी गुणपत्रिका देण्याचे आदेश विद्यापीठाला देऊन याचिका निकाली काढली. प्रतिवादींचे विद्यापीठ हे महिलांसाठी असले, तरी विद्यापीठाचा मूळ उद्देश हा विद्यादान करणे आहे.

तसेच नियम आणि अटी-शर्ती या केवळ विद्यार्थ्याला प्रवेश देताना लागू होतात. या प्रकरणात तुम्हाला याचिकाकर्त्याला प्रवेश द्यायचा आहे, त्यामुळे तुमचा मूळ उद्देश अबाधित राहील. त्यात कुठलाही बदल होणार नाही, असे न्यायालयाने विद्यापीठाला उपरोक्त आदेश देताना सुनावले. त्याचप्रमाणे, याचिकाकर्त्याच्या नव्या ओळखीची सरकारी दरबारी सगळीकडे रितसर नोंद झाली असताना केवळ एका गुणपत्रिकेवर ती ओळख नाकारणे योग्य ठरणार नाही, असेही आदेश देताना स्पष्ट केले.