उच्च न्यायालयाचा टोमणा; सरकारला धोरण आखण्याची सूचना

सध्या पोलिसांनाच संरक्षणाची गरज असल्याचा टोला हाणत तपासाच्या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याची आणि अधिकाऱ्यांना त्याचे विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले. तसेच राज्य सरकारने त्याबाबतचे धोरण तातडीने आखण्याची गरजही व्यक्त केली.

पोलीस ज्या प्रकरणाचा तपास करतात त्यातील आरोपीची निर्दोष सुटका होते किंवा तपास पूर्णत्वापर्यंत पोहोचतच नाही. अशा प्रकरणांचे काय होते, असा सवाल न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने केला. त्याचवेळेस तपास करण्याऐवजी पोलीस केवळ बंदोबस्तालाच जुंपलेले असतात, अशी टीपण्णीही केली. खुनांची प्रकरणे कशी हाताळायची, त्याचा तपास कशा पद्धतीने करायचा, याचे विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. उलट असे प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु पोलिसांना प्रशिक्षणच दिले जात नाही, असे नमूद करताना गंभीर गुन्ह्यचा तपास दहावी पूर्ण न केलेला हवालदार करत असेल तर त्या तपासातून काय साध्य होणार, असे न्यायालयाने सुनावले.

पुणे येथील निखिल राणे हत्याप्रकरणी अश्विनी राणे यांनी केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने पोलीस दलाचे मनुष्यबळ वाढवण्याबाबत, त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत उदासीन असलेल्या राज्य सरकारला धारेवर धरले. निखिल राणे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करूनही तपास अद्याप ‘जैसे थे’च आहे. तसेच न्यायालयाने या याचिकेची व्याप्ती केवळ या प्रकरणापुरती मर्यादित न ठेवता ती व्यापक केली आहे. मागील काही महिन्यांमध्येही महाराष्ट्रात विविध ठिकाणी पोलिसांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान कल्याणमध्ये पोलिसाला ठार करण्याचा प्रयत्न झाला होता.

  • नुकत्याच एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येकडे न्यायालयाने लक्ष वेधले. अशा प्रकरणांमध्ये एखाद्या आरोपीला अटक केली जाते आणि त्याच्याकडून बळजबरीने कबुलीजबाब घेतला जातो. परंतु खटल्यादरम्यान हे सगळे पुरावे कायद्यापुढे अपुरे ठरतात आणि खटल्याचा निकाल आरोपी निर्दोष सुटण्यात वा तपास पूर्ण न होण्यावर थांबतो, असेही न्यायालयाने सुनावले.
  • माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना गजाआड करणारे सीबीआयही सध्या मनुष्यबळाचे कारण सांगत तपासाची सूत्रे वर्ग करण्यास नकार देत असल्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.