मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कीटकजन्य, जलजन्य व प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक प्रभावी उपाययोजनांसाठी व एकत्रित आढाव्यासाठी राज्यस्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती व जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे. या उच्चस्तरीय समितीमुळे सर्व विभागांमध्ये समन्वय साधून राज्यात संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग, राष्ट्रीय विषाणू परिषद, पुणे, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग यांच्यामध्ये समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे राज्यस्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती व जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती पुनर्गठीत करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला वेळोवेळी दिल्या होत्या. त्यानुसार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उच्चस्तरीय समिती पुनर्गठन करण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘जीएसबी’च्या गणेशोत्सवासाठी ४००.५८ कोटींचे विमा संरक्षण
या उच्चस्तरीय समितीमुळे सर्व विभागांमध्ये समन्वय साधून राज्यात संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समित्यांकडील विषयांबाबतच्या कार्यवाहीच्या आढाव्यासाठी महाराष्ट्र संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समितीअंतर्गत राज्यस्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समिती आणि जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
हेही वाचा – पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक, गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू
सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात इतर संबंधित ३२ विभागांच्या सदस्यांचा समावेश आहे. सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे हे या समितीचे सचिव असतील. तसेच जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार असून, यात इतर २० विभागांचे सदस्य असतील. जिल्हा आरोग्य अधिकारी या समितीचे सचिव असतील.