मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावदेवी पोलिसांनी ४ व ५ एप्रिल रोजी बंदोबस्त ठेवला होता. परंतु इतकी महत्त्वाची गोपनीय माहिती मिळालेली असतानाही हा बंदोबस्त कायम ठेवणे वा मुंबई पोलिसांच्या संरक्षण विभागाकडून विशेष बंदोबस्त उपलब्ध करून देणे, याबाबत हलगर्जीपणा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराची उच्चस्तरावरून दखल घेतली गेली असून येत्या काही दिवसांत त्याचे प्रतिबिंब दिसून येईल, असे गृहविभागातील सूत्रांनी सांगितले.
एसटी कर्मचारी हे अधिक आक्रमक होऊन ४ एप्रिल येथे मंत्रालय आणि ५ एप्रिल रोजी सिव्हर ओक तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर तसेच खासगी निवासस्थानी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निशीत मिश्र यांनी ४ एप्रिल रोजी पोलीस सहआयुक्तांना (कायदा व सुव्यवस्था) लेखी पत्राद्वारे दिली होती. या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. ही माहिती मिळताच गावदेवी पोलिसांनी ४ व ५ एप्रिल रोजी मोठा बंदोबस्त लावला होता. या बंदोबस्ताच्या आदेशाची प्रतही ‘लोकसत्ता’कडे आहे. सिल्वर ओकवर हल्ला होणार असल्याची ही माहिती संवेदनाक्षम असतानाही गावदेवी पोलिसांनी हा बंदोबस्त कायम ठेवला नाही. हा बंदोबस्त उठविल्यानंतर खबरदारी म्हणून संरक्षण विभागावर ही जबाबदारी न सोपविल्याची दखल घेण्यात आली आहे. विशेष शाखा व संरक्षण विभाग हे दोन्ही सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या अखत्यारीत येतात.
या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रा. गो. राजभर यांना निलंबित करण्यात आले आहे. सिल्वर ओक चौकी व बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर सहा व १४ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस ठाण्याला दररोज २० पोलीस कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी देणे शक्य नाही. अशावेळी संरक्षण विभागाकडे असलेल्या पोलिसांना तैनात करता आले असते. मात्र हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेणे आवश्यक असतो. मात्र सिल्वर ओकवरील बंदोबस्ताबाबत हा निर्णय घेण्यात आला नाही, हे स्पष्ट झाले आहे. तरीही आता वरिष्ठ निरीक्षकांपाठोपाठ आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हे प्रकरण शेकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे.