रुग्णदुपटीचा कालावधी ४१ दिवसांचा

मुंबई : मुंबईतील रुग्णवाढीचा वेग मंदावलेला असला तरी बोरिवली, कांदिवलीमध्ये रुग्णवाढ वेगाने होते आहे. मात्र गेल्या आठवडय़ापासून बोरिवलीला मागे टाकत ग्रॅंटरोड, नानाचौक, मलबार हिलचा भाग असलेल्या डी विभागात रुग्णवाढीचा दर सर्वात जास्त आहे. या भागात दररोज सरासरी ७० रुग्णांची भर पडते आहे.

मुंबईतील रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्णवाढीचा सरासरी दर १ टक्कय़ापेक्षा खाली आहे. मात्र काही विभाग असे आहेत जिथे हा दर जास्त आहे. पश्चिम उपनगरातील बोरिवलीत हा दर १.५ टक्के आहे. तर कांदिवलीत हाच दर १.३ टक्के आहे. नानाचौक-मलबार हिल परिसराचा दर गेल्या आठवडय़ात वाढला असून येथे रुग्णवाढीचा दर १.७ टक्के आहे. संपूर्ण मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७५ दिवसांचा असताना या भागात मात्र हाच कालावधी ४१ दिवस आहे. गेल्या आठवडय़ात मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत दहा दिवसात ३६ रुग्णांची नोंद झाल्यामुळे ही संपूर्ण सोसायटी प्रतिबंधित करण्यात आली आहे. तेव्हापासून हा विभाग चर्चेत आहे.

एकाच घरातील ११ जण बाधित

डी विभागात सध्या जे रुग्ण आढळत आहेत ते विशेषत: उच्चभ्रू वसाहतीतील इमारतीत राहणारे आहेत, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पेडररोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील एका घरातील ११ जण बाधित झाल्याचे आढळून आले आहे. या घरातील सर्वांनी आपल्या चाचण्या करून घेतल्या होत्या. मात्र यापैकी कोणालाही लक्षणे नाहीत, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिजन चाचण्यांमुळेही रुग्णसंख्येत वाढ

गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रतिजन चाचण्या केल्या जात असल्यामुळे त्यांचेही अहवाल येत असून रुग्णसंख्येत वाढ होते आहे. त्यातूनच गुरुवारी ताडदेव येथील पोलीस वसाहतीतील १० पोलीस कर्मचारी बाधित झाल्याचे आढळून आले आहे. सध्या आकडा वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

डी विभाग

’ मलबार हिल, पेडर रोड, नानाचौक, मुंबई सेंट्रल

’ रुग्णवाढ  – १.७ टक्के

’ रुग्णदुपटीचा कालावधी-४१ दिवस

’ एकूण रुग्ण – ४२२९

’ सक्रिय रुग्ण – ८२७