मुंबई : महामार्गांवरील अपघातांतील जखमींवर महामार्ग पोलिसांनी नेमलेल्या मृत्यूंजय दुतांमुळे तत्पर उपचार करण्यास मदत होत आहे. मार्च २०२१ पासून २,६७१ अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. अपघातग्रस्तांना अपघातानंतरच्या पहिल्या ६० मिनिटांत (गोल्डन अवर) यशस्वी वैद्यकीय उपचार मिळत आहे.
राज्यात सध्या ४,११८ मृत्युंजय दूत कार्यरत आहेत. देशात महामार्गांवरील रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी साधारण दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. यात वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. महामार्गांचा आवाका पाहता पोलिसांची संख्या देखील तुटपुंजी असल्याने जखमींना तत्काळ मदत पुरविताना अनेक अडचणी येतात. यामुळेच महामार्गाचे माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून ”मृत्यूंजय दूत” ही संकल्पना मार्च, २०२१ पासून सुरू करण्यात आली.
राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील मॉल, पेट्रोल पंप, ढाबे, हॉटेलांमधील कर्मचारी, गावांतील नागरिकांचा एक समूह तयार करून त्यांना अपघातांनंतर मदत करण्यासाठी नियुक्त केले जात आहे. खासगी, सरकारी रुग्णालयांचे अधिकारी तसेच सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत या देवदूतांना जखमींवर प्रथमोपचार कसे करावेत, त्यांना कसे हाताळावे याचे प्रशिक्षण दिले गेले आहे.
देवदूतांच्या प्रत्येक समूहाला स्ट्रेचर व प्राथमिक उपचारांसाठीचे साहित्यही पुरविण्यात आले आहे. याशिवाय महामार्गांवरील रुग्णालयांची नावे व त्यांचे संपर्क क्रमांक त्याचप्रमाणे १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका कुठे आहे, याबाबतची अद्ययावत माहितीही या मृत्यूंजय दूतांना दिली आहे. रस्ते अपघातातील जवळपास ४० ते ५० टक्के मृत्यू हे अपघातानंतरच्या पहिल्या तासात म्हणजेच ”गोल्डन अवर” मध्ये वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे होतात. मृत्युंजय दूत याच वेळेत अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचार देऊन आणि त्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचवून मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे काम करतात.
पाच महामार्ग पोलीस हद्दीत ९२९ स्वयंसेवकांना प्रशिक्षण प्रमाणपत्रे मिळाली आहेत. ठाणे (४०), पुणे (२३), रायगड (३६), नागपूर (५४०) आणि छत्रपती संभाजीनगर (२९०). राज्य महामार्ग पोलीस आणि रेझिलिएंट फाउंडेशन प्रथमोपचारासह आपत्कालीन प्रतिसाद प्रशिक्षण देतात. या फाउंडेशनने १९ जिल्ह्यांमध्ये ३६ सत्रे आयोजित केली आहेत.
मृत्युंजय दूत कोण
महामार्गाच्या कडेला असणारे मॉल, पेट्रोल पंप, ढाबे, हॉटेल्सचे कर्मचारी तसेच महामार्गालगतच्या गावांमधील स्थानिक नागरिक यांचा यामध्ये समावेश केला जातो. या व्यक्ती अपघातस्थळाच्या सर्वात जवळ असल्याने प्रशासकीय मदत पोहोचण्यापूर्वी अगदी काही मिनिटांत घटनास्थळी धावून जाऊ शकतात.
