अंबोली पोलिसांना कारवाई करण्यासाठी न्यायालयाचा मज्जाव

चामडय़ाची बॅग वापरण्यावरून गौरक्षकांकडून आपली छळवणूक झाल्याचा, आरोप करणारा जाहिरात व्यावसायिक बरुण कश्यप याच्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ाबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सकृतदर्शनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच पोलिसांना त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यास मज्जाव देखील केला आहे.

गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या या प्रकाराविषयी पोलिसांनी आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. यावेळी ‘चौकशीदरम्यान दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी बरुण याने हा सगळा बनाव केल्याचे चौकशीत मान्य केल्याचा दावा करत पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्या विरोधात बरुण याने न्यायालयात धाव घेताना गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने बरुण याने हा बनाव केल्याचे मान्य जरी केले तरी त्याच्याविरोधात या आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच त्याच्या विरोधात दाखल गुन्ह्य़ाप्रकरणी कारवाई करण्यास अंबोली पोलिसांना मज्जाव केला आहे.

‘फेसबुक’वर बनाव

आपल्याकडे चामडय़ाची बॅग असल्याचे दिसताक्षणीच ज्या रिक्षातून आपण प्रवास करत होतो, त्याच्या चालकाने रिक्षा थांबवली व आपल्या साथीदारांना बोलावून आपली छळवणूक केली. ते सगळे स्वत:ला गोरक्षक सांगत होते, असा आरोप ‘फेसबुक’च्या माध्यमातून करत बरुण याने खळबळ उडवून दिली होती.