hindu organisations organise a massive jan aakrosh morcha against love jihad mumbai print news zws 70 | Loksatta

हिंदूत्ववादी संघटनांचे शक्तिप्रदर्शन; हिंदू जनआक्रोश मोर्चाची लव्ह जिहाद आणि धर्मातरविरोधी कायद्याची मागणी

शिवसेनेच्या हिंदूत्वाला प्रत्युत्तर म्हणून भाजप व शिंदे गटाने शक्तिप्रदर्शन करीत हिंदूत्वाचे आम्हीच पुरस्कर्ते आहोत, असा संदेश दिला.

massive jan aakrosh morcha against love jihad in mumbai
लव्ह जिहाद आणि धर्मातरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदूत्ववादी संघटनांकडून रविवारी शिवाजी पार्क येथे मोर्चा काढण्यात आला होता.

मुंबई : लव्ह जिहाद आणि धर्मातरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदूत्ववादी संघटनांकडून रविवारी शिवाजी पार्क येथे मोर्चा काढण्यात आला होता. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर या मोर्चात सहभागी झाले होते. 

शिवसेनेच्या हिंदूत्वाला प्रत्युत्तर म्हणून भाजप व शिंदे गटाने शक्तिप्रदर्शन करीत हिंदूत्वाचे आम्हीच पुरस्कर्ते आहोत, असा संदेश दिला. तर केंद्र व राज्यात सरकार असताना भाजपला जनआक्रोश का करावा लागतो, असा सवाल शिवसेनेने केला. लव्ह जिहाद आणि धर्मातर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे राज्यभर सध्या आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी मुंबईत शिवाजी पार्क परिसरात मोर्चा काढण्यात आला होता. या माध्यमातून भाजपने शक्तिप्रदर्शन करण्याची संधी सोडली नाही. सध्या लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत. हिंदू मुलींचे धर्मातर करून फसवणूक व शोषण केले जात आहे. त्यामुळे याविरोधात काही हिंदूत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन सकल हिंदू समाजातर्फे हा मोर्चा आयोजित केला होता. त्यात मोठय़ा संख्येने नागरिक सामील झाले होते. राज्य सरकारने कठोर कायदा करून लव्ह जिहाद आणि सक्तीने धर्मातर करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेते व पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी व मनोज कोटक, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नितेश राणे, अमित साटम, माजी आमदार कृपाशंकर सिंह, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदी सहभागी झाले होते. शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत हिंदूत्वाच्या मुद्दय़ाला बगल दिल्याचा आरोप भाजपकडून वारंवार केला जातो. हिंदूू जनआक्रोश मोर्चातून मतांच्या ध्रुवीकरणावर भर देत हिंदूत्वाचे खरे पुरस्कर्ते आम्हीच आहोत हे अधोरेखित करण्याचा भाजपने प्रयत्न केला. गेल्या आठ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे हिंदूत्ववादी सरकार सत्तेवर असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ का आली, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी गळय़ात भगवे शेले आणि डोक्यावर भगवी टोपी परिधान केली होती. हिंदू महापुरुष व योद्धय़ांची वेशभूषा करून अनेक लहान मुले सहभागी झाली होती. याचसोबत मोर्चात हातात भगवे झेंडे आणि लव्ह जिहाद आणि धर्मातराच्या विरोधातील मजकूर असलेले फलक होते आणि सातत्याने ‘जय श्री राम’चा नारा दिला जात होता.

आमदार राजासिंह यांची उपस्थिती

या मोर्चासाठी खास तेलंगणावरून आमदार राजासिंह आले होते. ते म्हणाले की, ‘हिंदू तरुणींनो कोणतीही वस्तू ही हिंदू व्यक्तीच्याच दुकानातून खरेदी करा. हलाल प्रमाणपत्र असलेल्या वस्तू फेकून द्या, कारण या माध्यमातून तुमचे पैसे हे तुम्हालाच मारण्यासाठी पुरवले जातात. याचसोबत हिंदूंनो व्यायामशाळेत गेल्यावर प्रशिक्षण हे हिंदू व्यक्तीकडूनच घ्या आणि हिंदू तरुणींनो नृत्यवर्गात गेल्यावर नृत्यसुद्धा हिंदू व्यक्तीकडूनच शिका. याचबरोबर दर रविवारी आपल्या सोसायटीत किमान एक तास वर्ग घ्या आणि त्यात कोणासोबत मैत्री करायची आणि कोणाशी मैत्री नाही करायची, याची शिकवण द्या. जेणेकरून आपल्या तरुणी लव्ह जिहादच्या बळी पडणार नाहीत’

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 03:11 IST
Next Story
पंतप्रधानांचा १० फेब्रुवारीला मुंबई दौरा