मुंबई : ११० वर्षांची कारकीर्द असलेल्या हिंदुजा समूहाच्या हिंदुजा फाऊंडेशनने टाइप १ मधुमेह उपक्रमा’द्वारे मुंबई, पुणे आणि चेन्नईमधील १००० हून अधिक गरजू मुलांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण केला आहे. हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील सामाजिक कार्याचे अद्वितीय मॉडेल असून ज्यात मुलांना सर्वसमावेशक वैद्यकीय, पौष्टिक आणि भावनिक देखभाल पूर्णपणे निःशुल्क दिली जाते.जागतिक मधुमेहदिनामित्ताने हिंदुजा फाऊंडेशनच्यावतीने या उपक्रमाची माहिती देण्यात आली.
या फाउंडेशनच्या कामाची सुरुवात एप्रिल २०१९ मध्ये झाली, टाईप १ मधुमेह असलेल्या गरजू मुलांना निरोगी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले होते. फक्त सहा वर्षांत, या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांमध्ये रुग्णालयात भरती व्हावे लागण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे आणि एचबीए१सीची सरासरी पातळी १०.४ टक्यांवरून वरून ७.८ टक्क्यांपर्यंत सुधारली आहे. या उपक्रमाने कुटुंबांची आर्थिक स्थिती देखील मजबूत केली आहे आणि विद्यार्थ्यांना तिरंदाजी आणि बुद्धिबळ यांसारख्या राज्यस्तरीय खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रोत्साहन दिले आहे. भारतात सध्या टाईप १ मधुमेह असलेल्या मुलांची संख्या जगात सर्वाधिक आहे. या केसेसमध्ये दरवर्षी जवळपास ६.७ टक्के दराने वाढ होत आहे, ज्यामुळे सर्वांना समान, आजीवन मधुमेह देखभाल मिळण्याची किती निकड आहे ते अधोरेखित होते.
हिंदुजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण कल्याणकृष्णन यांनी सांगितले, टाइप १ मधुमेह ही केवळ एक वैद्यकीय स्थिती नाही, तर धैर्य, शिस्त आणि आशेचा एक आजीवन चालणारा प्रवास आहे. टी १ डी १ च्या माध्यमातून आम्ही प्रत्येक मुलाच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबतीला आहोत, त्यांना सहानुभूतीपूर्ण, समुदाय-आधारित काळजीद्वारे उपचार मिळवण्यात, जुळवून घेण्यास आणि उत्कर्ष साधण्यात मदत करत आहोत.
‘टाईप १’ डायबेटिस इंडिया’ हा उपक्रम, पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन अँड डॉ. मोहनस् डायबेटिस स्पेशालिटीज सेंटर आणि केईएम हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलांना सर्वसमावेशक साहाय्य पुरवले जाते, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: मोफत इन्सुलिन, निदान आणि तपासणी, समुपदेशन, समूह शिक्षण मंच (म्हणजेच इतर रुग्णांकडून किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून शिकणे आणि अनुभव शेअर करणे) या सर्वांच्या माध्यमातून, गरजू मुलांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे, त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि सहानुभूतीपूर्ण देखभाल प्रदान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
वैद्यकीय मदत म्हणून सुरू झालेला हा प्रवास लवकरच एक परिवर्तनाची गाथा बनला. यामध्ये ४० हून अधिक मुलांना इन्सुलिन पंप्स देण्यात आले. यात २० प्रगत स्वयंचलित इन्सुलिन वितरण प्रणालींचा समावेश आहे, ज्यामुळे त्यांना अधिक परिपूर्ण, निरोगी जीवन जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. पुण्यामध्ये, हिंदुजा फाउंडेशन आणि केईएम हॉस्पिटल यांनी ‘क्लबवन’ नावाचा एक उत्साही पीअर-सपोर्ट प्लॅटफॉर्म तयार केला असून जो रुग्णांमध्ये कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि आशा वाढवतो.
उपक्रमात नोंदणी केलेल्या मुलांमधील रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे तसेच शाळेतील उपस्थिती आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमांमध्ये सहभाग वाढला असून आहारावर नियमित देखरेखीमुळे पोषण आणि वाढीच्या परिणामांमध्ये सुधारणा झालेली दिसते. या फाउंडेशनने हार्वर्ड विद्यापीठाच्या सेंटर फॉर डायबेटिस अँड एंडोक्रिनोलॉजीसोबत सहकार्य करून जागतिक मधुमेह संशोधनात योगदान दिले आहे. ज्याचे निष्कर्ष २०२५ मध्ये बँकॉक आणि व्हिएन्ना येथील आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडण्यात आले. आगामी काळात देशभरात देशभरात मधुमेह व्यवस्थापन अधिक परवडणारे, सुलभ आणि डिजिटल-सक्षम करण्याचा फाऊंडेशनचा मानस आहे.
