हिरेन हत्या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे

कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि अंबानी कुटुंबाला धमकी देणारे पत्र आढळले.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : उद्योगपती मुके श अंबानी धमकी प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविला. या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) सुरू होता.

एनआयएच्या प्रवक्त्या जया रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने या हत्या प्रकरणाचा तपास हाती घ्यावा याबाबत आदेश जारी केले आहेत. पुढील प्रक्रिया सुरू आहे, असे लोकसत्ताला सांगितले.

मनसुख यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा खाडी, रेतीबंदर येथे सापडला. आदल्या रात्री ते कांदिवलीतील तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी घोडबंदरला जातो, असे सांगून घराबाहेर पडले आणि बेपत्ता झाले होते. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला सापडलेली स्कॉर्पिओ कार तीन वर्षांपासून मनसुख यांच्या ताब्यात होती. या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि अंबानी कुटुंबाला धमकी देणारे पत्र आढळले. पोलीस यंत्रणांनी जेव्हा मनसुख यांच्याकडे जाब विचारला तेव्हा ही कार १७ फेब्रुवारीला चोरी झाली, त्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात दिली होती, असे सांगितले.

मात्र मनसुख आणि अटक आरोपी सचिन वाझे यांच्यात मैत्री होती. मनसुख यांची स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती तर ती वाझे यांच्या ताब्यात होती, वाझे यांनीच ही गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाजवळी उभी केली, असा संशय एनआयएला आहे.

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळील सीसीटीव्ही चित्रणात स्कॉर्पिओजवळ फिरणारी संशयित व्यक्ती वाझेच होते, हे स्पष्ट करण्याची धडपड एनआयएने सुरू केली आहे.

शुक्रवारी वाझे यांना कार मायकल रोडवर आणण्यात आले. स्कॉर्पिओ  जेथे उभी करण्यात आली तेथे नेण्यात आले. तेथून त्यांना काही अंतर चालण्यास सांगण्यात आले.

त्याचे चित्रीकरण केले गेले. हे चित्रण आणि सीसीटीव्ही चित्रण तज्ज्ञ जुळवून पाहाणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hiren murder case to nia akp

ताज्या बातम्या