मुंबई :  राज्यातील एखाद्या खेडेगावात असलेल्या आपल्या जिवलगापर्यंत पत्र पोहोचवायची गरज ते आज अवघे जग इंटरनेटच्या वेगावर धावत असताना ऑनलाइन खरेदीपासून घरोघरी खाद्यपदार्थाच्या ऑनलाइन वितरण व्यवस्थेपर्यंत सगळीकडे महत्त्वाची ठरणारी गोष्ट ‘पिन कोड’. भारतीय टपाल खात्याने १५ ऑगस्ट १९७२ रोजी पत्रांची विभागवार वर्गवारी सोपी व्हावी म्हणून ‘पिन कोड’ (पोस्टल इंडेक्स नंबर कोड) ही पद्धत अंमलात आणली होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवदिनी या ‘पिन कोड’ची पन्नाशी साजरी करण्यात आली.

एकेकाळी टपाल खात्याचे कार्य सुलभ आणि अधिक वेगाने होण्यासाठी सुरू केलेली ही ‘पिन कोड’ पद्धत आज इंटरनेट आणि गुगल मॅपसारखे अद्ययावत तंत्रज्ञान असतानाही तितकीच गरजेची ठरत आहे. ‘पिन कोड’ नामक या सहा आकडय़ांत तुम्ही कुठल्या राज्यात राहता?, तुम्ही ज्या शहरात राहता ते कुठल्या राज्यात आहे? तुमच्या भागाच्या अगदी जवळचे टपाल खाते कोणते? ही सगळी माहिती दडलेली असते.

ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?
Mpsc Mantra General Science Question Analysis career
Mpsc मंत्र: सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

जनक कोण?

संस्कृत आणि पाली भाषेचे अभ्यासक, टपाल खात्यात पोस्ट मास्तर जनरल म्हणून कार्यरत असलेल्या श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी या ‘पिन कोड’ पद्धतीचा शोध लावला. ते टपाल खात्यात कार्यरत असताना १९७२ मध्ये या पद्धतीचा प्रत्यक्ष सेवेत वापर करण्यात आला होता. ‘पिन कोडचे जनक’ म्हणून नावाजलेले वेलणकर यांनी भारत सरकारच्या संचार खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणूनही काम पाहिले होते.

गरज काय?

टपाल खात्यात सुरुवातीला पत्रांवर लिहिलेले पत्ते वाचून त्यांची विभागवार वर्गवारी केली जात होती. मात्र अनेकदा शहरांची वा परिसराची समान नावे किंवा एकाच नावाची माणसे यामुळे ही वर्गवारी करताना गोंधळ उडत होता. त्यातही विविध भाषेतील पत्रे टपाल खात्याकडे येत असल्याने ती वाचून शहराचा वा राज्याचा पत्ता शोधणेही अवघड काम होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘पिन कोड’ पद्धत अंमलात आली. पिन कोड पद्धतीमुळे टपाल खात्याची पत्रनिवड प्रक्रिया अधिक वेगाने आणि सोपी झाली.

एकीकडे शतकोत्तरी वाटचाल सुरू असलेले टपाल खाते तोटय़ात आहे, असे सांगत त्याच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. देशभरात ठिकठिकाणी टपाल खात्याच्या खासगीकरणाला विरोध होत आहे, तर दुसरीकडे ई-मेलच्या दुनियेत ‘पत्र’ ही संकल्पनाच कालबाह्य असल्याचे मानले जात असून टपाल सेवेला कमी महत्त्व दिले जात आहे. मात्र या टपाल सेवेचे काम जलदगतीने होण्यासाठी अवलंबण्यात आलेली ‘पिन कोड’ पद्धत ऑनलाइन खरेदीपासून ई-मेलपर्यंत सगळीकडेच बहुपयोगी ठरल्याने अजरामर झाली आहे.

आकडय़ांचे अर्थ..

* राज्यांचे एकत्रित असे आठ स्वतंत्र विभाग (झोन) करण्यात आले. प्रत्येक विभागाला एक आकडी क्रमांक देण्यात आला.

* नववा विभाग हा सैन्यदलाच्या टपाल सेवेसाठी राखीव करण्यात आला. पिन कोडच्या सहा आकडय़ांमध्ये पहिला आकडा हा संबंधित राज्य दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा कोणत्या विभागात मोडते हे दर्शवतो.

* दुसरा अंक त्या विभागातील उपविभाग स्पष्ट करतो. तिसऱ्या अंकातून जिल्हा कोणता हे लक्षात येते.

* शेवटच्या तीन आकडय़ांतून जिल्ह्यातील शहर, संबंधित परिसर आणि तेथील जवळचे टपाल खाते हा तपशील स्पष्ट होतो.