Worli hit and Run: मुंबईतल्या वरळी हीट अँड रन प्रकरणात नवी माहिती समोर येते आहे. बीएमडब्ल्यू या आलिशान कारने महिलेला चिरडलं. या घटनेत त्या महिलेचा मृत्यू झाला. या कारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर होता असा आरोप होतो आहे. बीएमडब्ल्यू चालकाने प्रदीप नाखवा आणि त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा यांना चिरडलं आणि फरपटत नेलं. या अपघातात प्रदीप नाखवा बाजूला पडले. यानंतर प्रदीप नाखवा यांचा आक्रोशही समोर आला आहे. तसंच अपघाताच्या आधी काय काय घडलं? ती माहितीही समोर आली आहे. अपघाताच्या आधी काय काय घडलं? समोर आलेल्या माहितीनुसार, हीट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या चालकाला सांगितलं की आपल्याला लाँग ड्राईव्हवर जायचं आहे. प्रवासादरम्यान तो मुंबईतल्या वरळी भागात आला. त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शाह स्वतः कार चालवत होता असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तसंच जो अपघात झाला तो एट्रिया मॉलजवळ झाला. तिथपासून त्याने कावेरी नाखवा यांना फरपटत नेलं. हा अपघात झाला तेव्हा मिहीरने मद्यप्राशन केलं होतं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे. मिहीरचा फोन बंद मिहीर शाह याच्यासह त्याचा चालक होता, वरळीतील नेहरू तारांगण येथील बस स्टॉपच्या समोरच्या बाजूने जात असताना पहाटे हा अपघात झाला. मिहीरचा फोन सध्या बंद आहे तसंच या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. हे पण वाचा- “पत्नीला फरफटत नेलं, अपघातानंतर गाडीवरील पक्षाचं स्टिकर काढलं”, वरळी हिट अँड रन पीडिताचे पुढाऱ्यांवर गंभीर आरोप मिहीर त्याच्या गर्लफ्रेंडलाही भेटला? मिहीर शाहानं अपघाताच्या स्थळावरून पळ काढला. त्यानंतर त्याने आपला मोबाइल बंद करून ठेवला. मिहीर शाह सध्या फरार आहे. तर पोलिसांनी शाह गर्लफ्रेंडला ताब्यात घेतलं आहे. मिहीर शाह त्याच्या गर्लफ्रेंडला भेटला होता अशी माहिती समोर आली आहे. अपघातानंतर गाडीवर असलेल्या पक्षाचे चिन्ह खोडून काढण्याचाही प्रयत्न झाला. या प्रकरणावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपघाताचा हा घृणास्पद प्रकार आहे. वेळीच ब्रेक मारला असता तर त्या महिलेचा जीव वाचला असता. हे पण वाचा- “BMW चालकानं गाडी पळवली नसती तर…”, वरळीतील अपघातावर मनसेच्या संदीप देशपांडेंची संतप्त प्रतिक्रिया प्रदीप नाखवा यांचा आक्रोश अपघाताचे वर्णन करत असताना नाखवा यांना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले, “वरळीतील सीजे हाऊस पासून ते वरळी सी लिंकपर्यंत त्या कारने माझ्या पत्नीला फरफटत नेले. तिच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. दोन मुलांना टाकून माझी पत्नी आता गेली. आम्ही मासे विकून आमचा उदरनिर्वाह चालवतो. आता आम्ही जगायचे कसे? आज या पक्षाचे त्या पक्षाचे लोक एकमेकांवर टीका करत आहेत. पण मागून हे आरोपींनाच पाठिंबा देतात. आम्हाला कोण वाचवणार?” असा उद्विग्न प्रश्न प्रदीप नाखवा यांनी विचारला आहे.