अपघात घडला कसा, हा प्रश्न अनुत्तरितच

मद्यधुंद अवस्थेत अभिनेता सलमान खान याने बेदरकारपणे गाडी चालवली व एकाच्या मृत्यूस तो कारणीभूत ठरला याबाबत सरकारी पक्षाने सादर केलेले सर्व पुरावे उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावत सलमानची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका केली. असे असले तरी न्यायालयाने निकाल देताना अपघात झाल्याचे नाकारलेले नाही. परंतु, अपघाताच्या मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांपैकी एकाचा मृत्यू झाला असून न्यायालयाने त्याची साक्ष अविश्वसनीय ठरवलेली आहे व दुसरा सलमानचा मित्र असल्याने सरकारी पक्षाने त्याला साक्षीसाठीच बोलावलेले नाही. त्यामुळे हा अपघात झाला तर तो कुणी केला हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे.
सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने सलमानला दोषी धरून पाच वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. त्याला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाची शिक्षा रद्द करत उच्च न्यायालयाने त्याला सर्व आरोपांमध्ये निर्दोष जाहीर केले. एवढेच नव्हे तर केवळ संशयाच्या आधारे एखाद्याला दोषी धरता येत नाही, असेही स्पष्ट केले. सलमानचे पारपत्र परत करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.

पुढे काय?
या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. उच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा अभ्यास करूनच त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.

सलमानला सोडण्याची प्रमुख कारणे..

’सलमानला दोषी धरण्यासाठी आवश्यक आणि सबळ पुरावेच न्यायालयासमोर सादर करण्यात आले नाहीत.
’खटल्यातील प्रमुख व मृत्युमुखी पडलेला साक्षीदार रवींद्र पाटील याने सतत आपली साक्ष बदलली. त्यामुळे न्यायालयाने त्याची साक्ष पूर्णपणे फेटाळली.
’नुरुल्लाचा मृत्यू गाडीखाली चिरडून झाला नाही, तर अपघातग्रस्त गाडी क्रेनद्वारे उचलली जाताना पुन्हा जमिनीवर आदळली आणि तो त्याखाली सापडल्याने झाला. त्याच्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे हा सदोष मनुष्यवध नाही.
’सलमानच्या गाडीचा टायर अपघाताआधी की नंतर फुटला याचेही पुरावे नाहीत.