मुंबई: करोना आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या झालेल्या संपामुळे एसटी महामंडळाचा १० हजार ८०० कोटी रुपयांचा प्रवासी महसूल बुडाला आहे. यामुळे महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले आहे. महामंडळाचा सर्वाधिक महसूल करोनाकाळातील निर्बंध आणि प्रवाशांनी फिरवलेली पाठ यामुळे बुडाला. एसटी महामंडळाने नुकत्याच घेतलेल्या आढाव्यातून ही माहिती समोर आली आहे.   करोना आणि संपातून बाहेर पडल्यानंतर महामंडळाकडून सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न होत आहेत. सध्या एसटी सेवेतून दररोज १८ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळू लागल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

कमी झालेल्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रवासी पुन्हा एसटीची निवड करीत असताना ऑक्टोबर २०२१ पासून विलीनीकरण आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आणि हा संप २२ एप्रिल २०२२ पर्यंत सुरुच राहिला. या काळात एसटीची सेवा ठप्पच होती. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आणि एसटीचे उत्पन्नही बुडाले.

आता रोजचे उत्पन्न.

सध्या महामंडळाच्या १३ हजार ४६८ एसटी प्रवाशांच्या सेवेत असून दररोजची प्रवासी संख्या २९ लाख ५० हजारांवर पोहोचली आहे. यातून महामंडळाला १८ कोटी १९ लाख रुपयांचा महसूल मिळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वाईट स्थिती..

एसटीतील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२० ते २६ ऑक्टोबर २०२१ या करोनाकाळात ८ हजार ६५ कोटी ८० लाख रुपये, तर २७ ऑक्टोबर २०२१ ते २२ एप्रिल २०२२ या संपकाळात २ हजार ८३२ कोटी रुपये प्रवासी महसूल बुडाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारकडूनच निधी प्राप्त होत आहे.

१ जूनपासून विजेवरील ‘शिवाई’

एसटी महामंडळ १ जून २०२२ पासून विजेवर धावणारी वातानुकूलित शिवाई बस ताफ्यात समाविष्ट करीत आहे. सुरुवातीला महामंडळ टप्प्याटप्याने ५० शिवाई बस प्रवाशांसाठी उपलब्ध करणार आहे. पहिली शिवाई बस पुण ते अहमदनगर मार्गावर धावेल. पुणे ते नाशिक ते पुणे मार्गावर १८ शिवाई गाडय़ा, पुणे ते कोल्हापूर ते पुणे १२ गाडय़ा, पुण ते औरंगाबाद ते पुणे १० आणि पुणे ते सोलापूर ते पुणे १० गाडय़ा धावणार आहेत.