मुंबई महानगरपालिका केद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने स्थापना करणार
डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, गोवर आणि अन्य संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच या आजारांच्या वाढीला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सोयी-सुविधांनी अद्ययावतर असलेली ही प्रयोगशाळा राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने उभारण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत दुधाचा नियमित पुरवठा करा; जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स प्रयोगशाळेची घोषणा करण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा ‘प्रधानमंत्री-आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन’अंतर्गत प्रस्तावित आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या प्रयोगशाळेत आजारांवर संशोधन करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रयोगशाळेसाठी आवश्यक निधी केंद्र सरकारकडून महानगरपालिकेला देण्यात येणार आहे. प्रकल्पाचे अंदाजपत्रक राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी डॉक्टर, माहिती विश्लेषक आणि अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. करोना विषाणूमधील उत्परिवर्तन लक्षात घेता महाराष्ट्रासह देशात मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट्स स्थापन करणे आवश्यक असल्याचे मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्याने सांगितले.
यांची होणार नियुक्ती
प्रयोगशाळेत वरिष्ठ महामारीविज्ञान शास्त्रज्ञ, सहाय्यक महामारीशास्त्रज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, विषाणूशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ सांख्यिकीतज्ज्ञ, डेटा विश्लेषणासाठी आयटी सल्लागार, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, हिवताप पर्यवेक्षक, कीटक संग्राहक आणि अन्य लिपिक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.