केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली. भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणे ही अतिशय आक्षेपार्ह बाब आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जी कारवाई करायची असेल ती होईल,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. याबाबत पोलीस आयुक्त निर्णय घेणार आहेत. दुसऱ्या बाजूचे लोक दोषी असतील तर त्याच्यावरही कारवाई होईल, असेही गृहमंत्री म्हणाले.

राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेला परवानगी नाकारायचे काही कारण नाही – दिलीप वळसे पाटील

मनेस प्रमुख राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेला परवानगी नाकारायचे काही कारण नाही. परवानगी मागितली तर पोलीस आयुक्त परवनागी देतील. पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे त्यांनी सभा घ्यायला हरकत नाही, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमामध्ये सोमवारी गोंधळ झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली. इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ आणि ‘जय श्रीराम’ या घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी बाल्कनीमधून ‘महात्मा गांधी की जय’ या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ व्यत्यय आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां वैशाली नगवडे यांच्यासह पाच महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली आहे.

दरम्यान, कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याने सभागृहामध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. यामध्येच राष्ट्रवादीच्या माहिलांना भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय. या प्रकरणामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीची दखल घेत डेक्कन पोलिसांनी भस्मराज तीकोने ( रा.कसबा पेठ) , प्रमोद कोंढरे(रा. नातू बाग), मयूर गांधी (शुक्रवार पेठ,) या भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखला केलाय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hm dilip walse patil reaction to the confusion in smriti irani program abn
First published on: 17-05-2022 at 12:54 IST