मुंबई : देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) अंतर्गत आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) तातडीने सुरू करण्याचे आदेश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिले आहेत. त्या आदेशांचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांविरुद्ध वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळामार्फत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील गँट वैद्यकीय महाविद्यालय संलग्न जे.जे. रुग्णालय, पुण्यातील बी.जी. वैद्यकीय महाविद्यालयासह ३२ महाविद्यालयांनी अद्याप ही प्रणाली सुरू केलेली नाही. त्यामुळे या महाविद्यालयांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वैद्यकीय शिक्षणाच्या किमान मानकांनुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांच्या संलग्न किंवा सहयोगी रुग्णालयांमध्ये एचएमआयएस प्रणाली सुरू करणे बंधनकारक केले आहे. या प्रणालीतील माहितीचा उपयोग एनएमसीचे विविध मंडळाच्या वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षणाची गुणवत्ता तसेच रुग्णालयांमधील वैद्यकीय सामग्रीची उपलब्धता तपासण्यासाठी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना आधार-सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली, एचएमआयएस आणि सीसीटीव्ही प्रणाली एनएमसीसोबत एकात्मिक करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच रुग्णांच्या आभा कार्डशी आरोग्य नोंदींची सांगड घालून डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध ठेवण्यावर भर दिला आहे. एनएमसीने २८ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी जारी केलेल्या सार्वजनिक सूचनांद्वारे सर्व महाविद्यालयांना त्यांच्या आरोग्य सुविधा नोंदणी कार्डची माहिती सादर करून संलग्न रुग्णालयांचे एचएमआयएस हे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या एबीडीएम- एचएमआयएस पोर्टलशी जोडण्याचे निर्देश दिले होते.

राज्यातील ३४ महाविद्यालये

आयोगाने नियमांचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांचे तीन प्रकार केले आहेत. पहिल्या यादीत एबीडीएम-सक्षम एचएमआयएस वापरत असतानाही आरोग्य नोंदींची सांगड किंवा स्कॅन सुविधा पूर्णपणे सुरू केल्या नसलेल्या महाविद्यालयांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीत अद्याप एबीडीएम-सुसंगत एचएमआयएस प्रणालीच सुरू न केलेली नाही. तर तिसऱ्या यादीत आरोग्य नोंदींची चुकीची माहिती सादर करणारी महाविद्यालये समाविष्ट करण्यात आली आहेत.

एनएमसीने या तिन्ही प्रकारामध्ये मोडत असलेल्या देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३४ महाविद्यालयांचा समावेश असून, त्यात १२ शासकीय महाविद्यालये तर २२ खासगी महाविद्यालये आहेत.

शासकीय महाविद्यालयांमध्ये मुंबईतील ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे.जे. रुग्णालय, पुण्याचे बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरजचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूरचे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, ठाण्याचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, धुळ्याचे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाईचे एस.आर.टी.आर. वैद्यकीय महाविद्यालय हे पहिल्या प्रकारात मोडत असून सोलापूरचे डॉ वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईतील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे दुसऱ्या प्रकारामध्ये मोडत आहेत. या महाविद्यालयांनी ही प्रणाली तातडीने सुरू न केल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.