‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’चे मुंबईच्या समुद्रात आगमन

६५ हजार टन वजनाची क्वीन एलिझाबेथ ब्रिटनची आकारमानाने सर्वात विशाल नौका.

|| अनिकेत साठे

मुंबई : ब्रिटनच्या शाही नौदलातील एचएमएस क्वीन एलिझाबेथ या विमानवाहू नौकेचे मुंबईलगतच्या अरबी समुद्रात आगमन झाले आहे. भारतीय नौदलासमवेत सरावासाठी प्रथमच दाखल झालेली ही विमानवाहू नौका ब्रिटनच्या सम्राज्ञीच्या नावाप्रमाणे भारदस्त आहे.

भारत-ब्रिटनच्या तिन्ही संरक्षण दलांच्या कोकण शक्ती या संयुक्त सरावास सुरूवात झाली आहे. त्या अंतर्गत २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत भारतीय नौदल आणि ब्रिटनच्या शाही नौदलातील युध्दनौका सराव करणार आहेत. या निमित्त क्वीन एलिझाबेथ ही नौका दाखल झाली. तिच्या प्रहारक दस्त्यात (कॅरिअर स्ट्राईक ग्रुप) हजार हत्तीचे बळ देण्याची क्षमता राखणारी लढाऊ विमाने, ब्रिटन-नेदरलँडच्या सात युध्दनौका, अमेरिकन नौदलाची विनाशिका आणि शाही नौदलातील एका पाणबुडीचा समावेश आहे.    

 ६५ हजार टन वजनाची क्वीन एलिझाबेथ ब्रिटनची आकारमानाने सर्वात विशाल नौका. पाचव्या पिढीतील लढाऊ विमान संचलनाची रचना असणारी ही जगातील पहिलीच नौका ठरली आहे. दोन डझनहून अधिक एफ – ३५ बी बहुउद्देशीय लढाऊ विमानांनी ती सभोवतालच्या विस्तीर्ण क्षेत्रावर आपले प्रभुत्व राखते. तिला गती देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या (प्रोपेलर) यंत्रणेतून ५० हायस्पीड रेल्वेला पुरेल इतकी ऊर्जा तयार होते. या नौकेची उंची नायगारा धबधब्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे अवाढव्य डोलारा असूनही ती दिवसाला ५०० सागरी मैल अंतर सहजपणे पार करते.

युध्दनौकेच्या प्रहारक दस्त्यात ब्रिटीश, अमेरिका आणि नेदरलँडचे ३७०० नौ सैनिक,  अधिकारी, वैमानिकांचा अंतर्भाव आहे. जगातील महत्त्वाच्या सागरी मार्गातून संचाराचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी क्वीन एलिझाबेथ २६ हजार सागरी मैलची सफर करीत आहे. त्यात ४० हून अधिक देशांना भेटी देण्यात आल्या. हिंद-प्रशांत क्षेत्रात भारतीय नौदलाशी सहकार्य वाढविले जात आहे. २१ व्या शतकात दोन्ही देशांसमोरील आव्हाने सारखीच आहेत. सभोवतालच्या क्षेत्रात चीन आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे. या क्षेत्रातील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या  उद्देशाने सरावातून उभय देशांची सैन्य दले आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणार आहेत.

प्रहारक दस्त्यातील एचएमएस डिफेंडर नौकेत नौदलाच्या पश्चिमी  मुख्यालयात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यातून दोन्ही देशांतील लष्करी संबंध र्वृंध्दगत करण्याचा संदेश देण्यात आला.

भारतीय शक्तीचे दर्शन

 या सरावात भारतीय नौदलाची आयएनएस कोलकात्ता, आयएनएस कोची आणि आयएनएस चेन्नई या विनाशिका, आयएनएस तलवार आणि आयएनएस तेज युध्दनौका, इंधनवाहू आयएनएस आदित्य जहाजही सहभागी होत आहे. तसेच नौदलाची सी किंग ४२ बी, कामोव्ह ३१ व चेतक हेलिकॉप्टर, मिग २९, डॉनिअर आणि भारतीय हवाई दलाची जॅग्वॉर, सुखोई, हवेत हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणारे आणि हवेत इंधन भरणारे विमानही सरावात राहणार असल्याची माहिती भारतीय नौदलाकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hms queen elizabeth arrives at mumbai career strike group akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी