स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरष्ट्रीय स्थळांना भेटीचे बेत; समुद्रकिनारे, तीर्थक्षेत्री गर्दीचा अंदाज

मुंबई: करोनाची ओसरलेली तिसरी लाट, हटविण्यात आलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून सलग चार दिवस आलेल्या सुट्टयांची संधी साधत अनेकांनी पर्यटनास्थळी जाण्याचे बेत आखले आहेत. जवळच्या तसेच आसपासच्या राज्यातील आणि काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांनाही पर्यटक पसंती देत आहेत. जाण्याची तयारी काही मंडळींनी केली आहे. परंतु राज्यात उपलब्ध नसलेल्या एसटी, मेल – एक्स्प्रेस गाडय़ांसाठी प्रतीक्षायादी यामुळे खासगी प्रवासी बसची निवड करताना अनेकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी १३ ते १८ एप्रिलपर्यंत भाडेदरात वाढ केली आहे.

गुरुवार, १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महावीर जयंती, १५ एप्रिलला गुड फ्रायडे आणि त्याला जोडून आलेला शनिवार, रविवार असे सलग चार दिवस सुट्टया आहेत. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच काही खासगी कार्यालयेही बंद आहेत. त्यामुळे अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजनही केले आहे.  पर्यटकांची पसंती आणि होणारी गर्दी यामुळे त्याचेही दर वाढले आहेत. काहींनी चार दिवसांच्या सुट्टयांमुळे आपल्या गावी जाणेही पसंत करीत आहेत. तळकोकण, तसेच विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्यासाठी रेल्वेगाडय़ा, खासगी बसचेही तिकीट काढण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र राज्यातील सुरळीत न झालेली एसटी आणि मेल, एक्स्प्रेस गाडय़ांसाठीची प्रतीक्षायादी यामुळे खासगी प्रवासी बसचे तिकीट काढण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करीत आहेत. मात्र त्यांना अव्वाच्यासव्वा भाडे द्यावे लागत आहेत. १४ ते १८ एप्रिलपर्यंत हे दर लागू असतील.

जवळची निवडक्षेत्रे

मालवण, शिर्डी, लोणावळा, अलिबाग, महाबळेश्वर, गणपतीपुळे, पाचगणी, माथेरानसह अन्य काही पर्यटनस्थळांची निवड करीत आहेत. तर शिर्डी, कोल्हापूर, अष्टविनायक दर्शनाला जाण्याची तयारी काही मंडळी करीत आहेत. यासाठी हॉटेल, रिसॉर्टचे मोठय़ा प्रमाणात बुकींग झाले आहे.

देशात कुठे?

एप्रिल महिन्यात इस्टरला जोडून आलेल्या या सुट्टीत आमच्याकडची बुकिंग्ज दुप्पटीने वाढली आहेत. दुचाकी वा चारचाकी वाहनाने पेंच, कान्हा, रणथंबोरसारख्या सफारीच्या ठिकाणी भेट देण्यास पर्यटक पसंती देत आहेत. उन्हाळय़ामुळे काश्मीरला पर्यटकांची गर्दी आहे, असे एसओटीसी ट्रॅव्हलच्या हॉलिडे विभागाचे अध्यक्ष डॅनियल डिसूझा यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय ठिकाणे..

आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्येही वाढ झाली असून देशाजवळ दुबई, अबुधाबी, मालदीव, मॉरिशसला पर्यटकांकडून प्राधान्य मिळत आहे, असे डॅनियल डिसूझा यांनी सांगितले. तसेच थायलंड आणि सिंगापूरलाही पर्यटक पसंती मिळता आहे. नेपाळला जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असल्याचे थॉमस कुकच्या हॉलिडे विभागाचे अध्यक्ष राजीव काळे यांनी सांगितले.