रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘व्हीएफएक्स’ कलाकारांचे मोठे नुकसान; अनेक कर्मचाऱ्यांची कपात

मार्चच्या अगदी दुसऱ्या आठवडय़ापर्यंत एप्रिल-मे महिन्यात प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या माव्‍‌र्हलपटांसह अन्य हॉलीवूडपट आणि वेबमालिकांची चर्चा सुरू होती. मात्र जसजसा करोनाचा विषाणू जगभर विस्तारत गेला तसे हॉलीवूडच्या मायानगरीचे चक्रच ठप्प झाले.

सध्या अनेक बिग बजेट हॉलीवूड चित्रपटांची निर्मितीच थांबवण्यात आली असून ते अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. माव्‍‌र्हल, डिस्ने, वॉर्नर ब्रदर्सच्या अशा बडय़ा निर्मितीसंस्थांनी आपले काम थांबवले असल्याने याचा मोठा फटका व्हीएफएक्स उद्योगाला बसला असल्याचे सीनियर व्हिज्युअलायझेशन आर्टिस्ट प्रसाद नर्से यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

माव्‍‌र्हलपटांवर सीनिअर व्हिज्युअलायझेशन आर्टिस्ट म्हणून काम करत असलेला प्रसाद सध्या जगभरात टाळेबंदी असल्याने आईसह ऑस्ट्रेलियामधील सिडनी शहरात अडकून पडला आहे. सध्या तो स्टुडिओतील अ‍ॅनिमेशन प्रॉडक्शनची अंतर्गत कामे करत आहे. चार आठवडय़ांपूर्वी प्रसाद माव्‍‌र्हलच्या सिडनीमधील प्रॉडक्शनवर कार्यरत होता. करोनाचा खूप मोठा फटका हॉलीवूडनगरीला बसला असून आगामी सगळ्याच चित्रपटांचे प्रदर्शन पाच ते सहा महिन्यांनी पुढे जाईल. कारण अनेक चित्रपटांची निर्मिती तात्पुरती थांबवण्यात आली असल्याची माहिती प्रसादने दिली.

यांचे प्रदर्शन पुढे ढकलले..

’पॅरामाऊंटचा ‘मिशन : इम्पॉसिबल ७’, सोनीचे ‘अन्चार्टर्ड’, ‘सिंड्रेला’, ‘द मॅन फ्रॉम टोरोंटो’, ‘श्राइन’, ‘द नाईटमेअर’ ; युनिव्हर्सलचे ‘ज्युरासिक वर्ल्ड : डॉमिनिऑन’, ‘फ्लिंट स्ट्रॉंग’’ वॉर्नर ब्रदर्सचे ‘मॅट्रिक्स ४’,‘द बॅटमॅन’, ‘फँटॅस्टिक बीस्टस् ३’, ‘किंग रिचर्ड’ ही महत्त्वाची निर्मितीसुद्धा स्थगित करण्यात आली आहे.

इतकेच नव्हे तर नेटफ्लिक्सची लवकरच प्रदर्शित होणारी ‘द पोएम’, ‘रेड नोटीस’, ‘द हार्डर दे फॉल’ हेही पुढे ढकलण्यात आले आहेत.

अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या महिन्यात सुरू होणार होते. मात्र चित्रीकरणच थांबले असल्याने पोस्ट प्रॉडक्शनचे कामही बंद झाले आहे. या सगळ्याचा खूप मोठा फटका व्हीएफएक्स इंडस्ट्रीला बसला असून ज्यांच्याकडे अंतर्गत काही छोटे-मोठे प्रकल्प आहेत तेच यातून तरू शकतील. डिस्नेसारख्या मोठय़ा निर्मिती संस्थेलाही याचा फटका बसला असून त्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णयही घेतला आहे. मात्र याही परिस्थितीतून चित्रपट उद्योग तरून जाईल.

– प्रसाद नर्से, ‘व्हीएफएक्स’ कलाकार

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood film production jams abn
First published on: 23-04-2020 at 00:59 IST