मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात आणखी एका प्रकरणात खुली चौकशी करण्याची परवानगी गृह विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिली आहे. त्यामुळे आता सिंह यांच्याविरोधात दुसरी खुली चौकशी सुरू करण्याचा एसीबीचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी पोलीस निरीक्षक अनुप डांगे प्रकरणारत सिंह यांच्याविरोधात चौकशीला गृह विभागाने मान्यता दिली होती.

पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला लेखी पत्र लिहून परमबीर  सिंह यांच्याविरोधात बेकायदा कृत्य व भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप केला होता. या १४ पानी पत्राची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, महासंचालक कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना पाठवण्यात आली होती. या पत्रात घाडगे यांनी परमबीर सिंह ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना श्रीमंत व्यक्तींची नावे विविध गुन्ह्यांतून काढण्यासाठी बेकायदा आदेश दिल्याचा आरोप केला होता. गैरव्यवहाराच्या एका प्रकरणातून २२ सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे काढण्याचे आदेश घाडगे यांना सिंह यांनी दिले होते. त्यांनी तो आदेश मानला नाही, त्यामुळे त्यांच्यावर चार खोटे गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आल्याचेही घाडगे यांनी पत्रात म्हटले होते. या प्रकरणी घाडगे यांच्या फिर्यादीवरून अकोला येथे गुन्हा दाखल करून तो ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी तक्रारीमध्ये परमबीर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या तक्रारी एसीबीला पाठवण्यात आल्या होत्या. त्याच्याआधारे या प्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. एसीबीने या प्रकरणी गोपनीय चौकशीला सुरुवात केली होती. चौकशीत पुढे आलेल्या काही तथ्यांनंतर खुली चौकशी करण्यासाठी एसीबीने गृह विभागाकडे मागणी केली होती. कोणत्याही अधिकाऱ्याविरोधात खुली चौकशी करण्यासाठी संबंधित अधिकारी काम करत असलेल्या विभागाची एसीबीला परवानगी घ्यावी लागते.