भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकावर पुन्हा एकदा अनेक गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे. २६/११ हल्ल्यात अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट बोगस असल्याचे म्हणत किरीट सोमय्या यांनी नवा आरोप केला आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

“शरद पवार यांचे नवाब मलिक हे दाऊचे पार्टनर आहे तर उद्धव ठाकरे यांची कसाबशी व्यावासायिक संबधं. मी जाणीवपूर्वक सांगू शकतो की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गॅंगपर्यंत पोहचू शकतात तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध कसाब पर्यंत आहेत. हेमंत करकरेंना देण्यात आलेले बुलेटप्रूफ जॅकेट हे बोगस होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे जॅकेट बिमल अग्रवाल यांनी पुरवले होते. यशवंत जाधव यांच्यावर ज्यावेळी धाड टाकण्यात आली त्यावेळी बिमल अग्रवाल यांचे नाव पुढे आले होते,” असे किरीट सोमय्या म्हणाले.

ही मोठी गमतीशीर गोष्ट आहे – दिलीप वळसे पाटील

“ही मोठी गमतीशीर गोष्ट आहे. कशाचा तरी कशासी संबंध जोडायचा प्रयत्न आहे. त्यांना कुठून माहिती मिळते हे मला माहिती नाही. पण या गोष्टीमध्ये तथ्य आहे असे मला वाटत नाही,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील बडा शेख दर्गा आणि छोटा शेख दर्गा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरं उद्ध्वस्त करून बांधल्याचा दावा केला आहे. याबाबतही गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. “यावेळी हे विषय काढून देशामध्ये आणि राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गोष्टीला इतके महत्त्व देता कामा नये. हजार वर्षापूर्वी ज्या घटना घडल्या त्यामधून मंदिर मशिदीचा वाद निर्माण करुन अस्थिर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रकारची कृती आणि वक्तव्ये कोणी करु नये. कृती करण्याचा काही प्रयत्न केला तर पोलीसांकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.