मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आज बैठक झाली. या बैठकीत समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जात होतं. ही बैठक संपल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला, तेव्हा त्यांनी या भेटीबाब माहिती दिली.

“आम्ही प्रभाकर साईल यांना संरक्षण देण्यात आलं आहे. त्यांनी केलेल्या सुरक्षेच्या मागणीवरून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. या राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षणासाठी आम्ही काम करत आहोत. अजून नवाब मलिक आणि माझी भेट झालेली नाही. ते सध्या निवडणुकीच्या प्रचारात आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे, ते समजून घेऊन मग पुढील योग्य ती कारवाई आम्ही करू.” तर, “एफआयआर दाखल करण्यासाठी कुणीतरी तक्रार द्यावी लागते, ती तक्रार दिली तर पोलीस पुढील कारवाई करतील.” असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.

तसेच, मुख्यमंत्र्यांनी याबाबत काही माहिती घेतली आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, “या विषयाबाबत माझी व मुख्यमंत्र्यांची जुजबी चर्चा झाली. फार काही चर्चा झाली नाही. मी दुसऱ्या बैठकीच्या निमित्त गेलेलो होतो. त्यामळे या विषयावर फार काही चर्चा झालेली नाही.”

गृहमंत्री वळसे पाटील ‘वर्षा’ बंगल्यावर; मुख्यमंत्र्यांशी समीर वानखेडेंविषयी चर्चा?

याचबरोबर, “आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा एवढा वापर इतक्या वर्षांमध्ये कधीही झालेला नव्हता. आता थोडासा जास्त वापर होतोय. असं देखील गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.

आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. प्रभाकर यांनी एक चित्रफीत प्रसारित केली आहे. तसेच प्रतिज्ञापत्रही समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडालेली आहे.