मुंबई : करोनाच्या संकटातून उद्योगधंदे सावरत असून मालमत्ता बाजारपेठाही स्थिरस्थावर होताना दिसत आहे.  सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून परिणामी ऑक्टोबरमध्ये घरविक्रीत आणि महसुलात वाढ झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये राज्यात १ लाख ६ हजार ८३१ घरे विकली गेली असून यातून मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने राज्य सरकारला १ कोटी ८३१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

मार्च २०२० मध्ये करोनाचे संकट आले आणि त्याचा मोठा फटका मालमत्ता बाजारपेठेला बसला. त्यामुळेच एप्रिल २०२० मध्ये राज्यात सर्वात कमी केवळ ७७८ इतकीच घरे विकली गेली होती.

पुढे जसजशी परिस्थितीत सुधारणा होऊ लागली तसतशी मालमत्ता बाजारपेठही सावरत गेली. मात्र घरविक्रीत म्हणावी तशी वाढ होत नसल्याने, महसुलात घट होत असल्याने राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात सवलत लागू केली. याचा चांगला परिणाम सप्टेंबर २०२० मध्ये झाला आणि घरविक्रीचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊ लागला.

डिसेंबर २०२० मध्ये तर विक्रमी घरविक्री झाली. तब्बल २ लाख ५५ हजार ५१० घरे डिसेंबरमध्ये विकली गेली आणि यातून २ हजार २१२ कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळाला.

करोनाकाळात केंद्र, राज्य सरकारने बांधकाम व्यावसायासंदर्भात अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याने त्याचा फायदा घरविक्रीला झाला.

मुंबईचा आकडा वाढताच

राज्यात ऑक्टोबरमधील १ लाख ६ हजार ९८२ घरविक्रींपैकी ८ हजार ५८६ घरे ही मुंबईतील आहेत. तर या घरविक्रीतून ५५० कोटींचा महसूल मिळाला आहे. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये घरविक्रीत पुन्हा चांगली वाढ झाली आहे. जुलैमध्ये विक्री झालेल्या घरांचा आकडा ६ हजार ७८४ असा होता आणि यातून ४२० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तर सप्टेंबरमध्ये ७ हजार ७९९ घरांची विक्री झाली होती.

सरकारने बांधकाम व्यावसायाला चालना देण्यासाठी जे काही धोरणात्मक निर्णय मागील वर्षभरात घेतले, त्याचा फायदा आज घरविक्री वाढीच्या रूपाने होताना दिसत आहे. दसरा-दिवाळीत दरवर्षी घरविक्रीत वाढ होते. त्यामुळे आता नोव्हेंबरमध्ये घरविक्री आणखी वाढेल. करोनातून बाजारपेठ सावरत असून सर्वच व्यवहाराला चालना मिळत आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक विकासक नवीन प्रकल्प घेऊन आले असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठय़ा सवलतीही देत आहेत. तेव्हा नोव्हेंबरमध्ये घरविक्रीत मोठी वाढ होईल अशी आशा आहे.

संदीप रुणवाल, नवनिर्वाचित अध्यक्ष, नरेडको, महाराष्ट्र