मुंबई: मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पाच्या अध्यक्षपदी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांसाठी ४५हजार निवासस्थाने उपलब्ध करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या टाऊनशिप प्रकल्पाद्वारे सुमारे पाच कोटी चौरस फूट क्षेत्राचे विकसन करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या टाऊनशिपसाठी लागणारा ३० टक्के निधी शासन देणार आहे. तर उर्वरित ७० टक्के निधी एमएसआयडीसी शासन हमीद्वारे विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरुपात उभारणार आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक व आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी आणि प्रकल्प सुरु करण्याकरिता महामंडळास १०० कोटी रुपयांचा प्राथमिक निधी सरकारने उपलब्ध करून दिला आहे.

प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर नियोजन, भूसंपादन, अनेक सरकारी संस्थांशी समन्वय, पायाभूत सुविधांचा विकास, वित्तीय व्यवस्थापन आणि वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलीस गृहनिर्माण टाऊनशिप प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चहल येत्या ३१जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनंतर, १ फेब्रुवारी पासून त्यांची मुंबई पोलीस गृहनिर्माण टाऊनशिप प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून कार्यकाल सुरू होत आहे. त्यांना राज्यमंत्र्यांच्या समकक्ष पदाच्या दर्जा देण्यात आला आहे. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत, जे आधी असेल तोपर्यंत असेल.