आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाने देशाची प्रगती साधणारे माजी पंतप्रधान, एक मुत्सद्दी राजकारणी, आपल्या वाणीने करोडोंना मंत्रमुग्ध करणारे अमोघ वक्ते आणि स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय राजकारणावर ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाने राजकारणातील एक तपस्वी व्यक्तिमत्व गमावले असल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जनसंघ आणि पुढे भाजपाला दिशा देणारे सर्वसमावेशक नेतृत्व अशीच अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख कायम राहील. नैतिक मूल्यांवर अढळ श्रध्दा असणारे राजकारणी, प्रखर देशभक्त अशी ओळख असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीयच नव्हे तर जागतिक राजकारणावर आपल्या कर्तृत्त्वा अमिट ठसा उमटवला. काव्यशास्त्र विनोदात रमणारे कवी मनाचे राजकारणी अशीही त्यांची एक ओळख कधीही न विसरता येणारी आहे. भविष्याचा वेध घेणारे त्यांचे सर्वसमावेशक विचार, मार्गदर्शन, नेतृत्व हे देशातील कोट्यवधी लोकांना कायम प्रेरणादायी, आश्वासक आणि समाजाला नवी दिशा देणारे ठरतील, असा विश्वासही तावडे यांनी शोकसंदेशात व्यक्त केला.