वाघोलीच्या भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टची दोन दशकांची अखंड सेवा

जेमतेम विशीच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या राजेशने भविष्याची स्वप्ने पाहावयास सुरुवात केली होती. त्या स्वप्नांच्या दुनियेत असतानाच एक दिवस अचानक काही तरी बिघडले. तब्येत ढासळत चालली. वैद्यकीय तपासण्या सुरू झाल्या, आणि निदान झाले.. रक्ताचा कर्करोग! मग तातडीने उपचार सुरू झाले, पण त्या आधुनिक वैद्यकीनेही या आजारापुढे हात टेकले. आता अखेरचा उपाय म्हणून राजेशच्या घरच्यांनी पुण्याजवळील वाघोली येथील ‘भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट’च्या आयुर्वेद क र्करोग उपचार प्रकल्पात त्याला आणले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू झाले आणि आश्चर्यकारकपणे त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या अनेकांना या प्रकल्पातील उपचारामुळे आशेचा एक किरण लाभला आहे. प्रामुख्याने रेडिएशन व केमोथेरपीमुळे होणारे दुष्परिणाम कमी होण्यास या उपचारांची निश्चितपणे मदत होते. विशेष म्हणजे आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करताना आधुनिक वैद्यकाच्या कसोटय़ांचा वापर या प्रकल्पात केला जातो. दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या या प्रकल्पात सुमारे साडेआठ हजार रुग्णांवर आजपर्यंत उपचार करण्यात आले असून यात परदेशी रुग्णांची संख्याही मोठी आहे.
भारतीय संस्कृती, कला, वेद तसेच आयुर्वेद व शास्त्रांचा जगभर प्रसार व्हावा यासाठी १९५४ मध्ये वैद्य सदानंद सरदेशमुख यांच्या वडिलांनी, प्रभाकर महाराज सरदेशमुख यांनी ‘भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट’ची स्थापना केली होती. अध्यात्मक्षेत्रात अधिकारी व्यक्ती म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रभाकर महाराजांनी आपली ७३ एकर जमीन ट्रस्टला दान दिली. यातूनच पुणे-नगर मार्गावरील वाघोली येथील या जागेत आज सुसज्ज रुग्णालय, कॅन्सर संशोधन केंद्र व आयुर्वेद महाविद्यालय सुरू आहे. भारतीय संस्कृतीतील एक अंग म्हणून १९८५ मध्ये ‘आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र’ स्थापन करण्यात आले. या संशोधन केंद्राच्या माध्यमातून पंचकर्म, संधिवात, एड्स तसेच कॅन्सरवर संशोधन करण्यात येते. १९९४ मध्ये संस्थेच्या माध्यमातून आधुनिक वैद्यकाच्या कसोटय़ांचा वापर करून कॅन्सर प्रकल्प सुरू करण्यात आला. तथापि आयुर्वेद अथवा पर्यायी उपचार पद्धतीकडे कॅन्सर रुग्ण हा शेवटच्या टप्प्यात येत असल्याचे लक्षात घेऊन तसेच एकाच छत्राखाली रुग्णाला आधुनिक व आयुर्वेदिक उपचार मिळण्याची गरज लक्षात घेऊन २०१० साली इंटिग्रेटेट कॅन्सर ट्रीटमेंट प्रकल्प सुरू करण्यात आला. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. आयुर्वेदातील डॉ. सरदेशमुख तसेच अन्य डॉक्टरांचे संशोधन लक्षात घेऊन ‘भाभा अ‍ॅटॉमिक सेंटर’ने संस्थेला रेडिएशनसाठी ‘कोबाल्ट मशीन’ दिले तर ‘आयुष’ने कोबाल्ट केंद्राच्या उभारणीसाठी साडेतीन कोटी रुपये दिले. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, डॉ. विजय भटकर तसेच भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुण्यातील या कॅन्सर संशोधन प्रकल्पाला भेट देऊन डॉ. सरदेशमुख यांच्या संशोधनाचा गौरव केला आहे. गेल्या दोन दशकांच्या वाटचालीत संस्थेने कॅन्सर उपचारावर चार जागतिक परिषदांचे आयोजन केले असून अनेक राष्ट्राय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये कॅन्सरवरील आयुर्वेद संशोधनावर शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत.