डेक्कन क्वीनच्या एका डब्यातील शौचकुपात आग लागल्याचे कळताच मध्य रेल्वेच्या बडय़ा बडय़ा अधिकाऱ्यांना घाम फुटला आणि विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांच्यापासून ते रेल्वे सुरक्षा दलाचे प्रमुख आलोक बोहरा यांच्यापर्यंत विविध अधिकाऱ्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक आठवर धाव घेतली.
मुंबईहून संध्याकाळी ५.१० वाजता सुटणारी डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरून रवाना होण्याआधीच या गाडीच्या शेवटून दुसऱ्या साधारण श्रेणीच्या डब्यातील शौचकुपातून धूर यायला लागला. अग्निशमन दलाच्या गाडय़ा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. साडेपाचच्या सुमारास ही आग आटोक्यात आली आणि हा डबा विलग करण्यासाठी गाडी यार्डमध्ये रवाना होत असतानाच बाजूच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ९ वर उभ्या असलेल्या मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेसच्या ‘एस-६’ या डब्याच्या शौचकुपातून धूर येऊ लागला.
डेक्कन क्वीनच्या पाहणीसाठी जमलेले अधिकारी पळत या डब्यापाशी गेले आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली. तेवढय़ात याच गाडीच्या ‘बी-१’ या वातानुकुलित डब्यातूनही धूर येऊ लागला.सर्वानी या डब्याकडे धाव घेतली.
तेवढय़ात प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर उभ्या असलेल्या मुंबई-हावडा मुंबई मेलच्या एस-३ या डब्यातील शौचकूपातून धूर येत असल्याची बातमी अधिकाऱ्यांना मिळाली. प्लॅटफॉर्म ९ वरून हा सर्व जमाव धावत-पळत या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १५ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचला. दरम्यान रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. ब्रिगेडियर सूद यांनी या डब्यांचीही पाहणी केली. २५-३० मिनिटे पाहणी केल्यानंतर ते मुख्य इमारतीकडे उभ्या असलेल्या आपल्या गाडीपाशी आले. तेथे मुकेश निगम, आलोक बोहरा यांच्याशी बातचित करत असताना आरपीएफच्या एका अधिकाऱ्याने त्यांना काही माहिती दिली.
घरी जाण्याच्या तयारीत असलेले ब्रिगेडियर सूद ही माहिती ऐकून तडक माघारी वळले आणि त्यांनी पहिल्या मजल्यावरील आरपीएफचा सीसीटीव्ही कॅमेरा चित्रीकरणाचा कक्ष गाठला. संध्याकाळी उशिरापर्यंत ब्रिगेडियर सूद आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी या चित्रीकरणाची पाहणी करत होते.