scorecardresearch

गुडघा शस्त्रक्रियेतील नफेखोरीला आळा

अपघात किंवा वयोवृद्धांमध्ये मोठय़ा प्रमाणात गुडघ्याची वाटी बदलण्यासाठी रोपण शस्त्रक्रिया केली जाते.

knee-transplant
गुडघे शस्त्रक्रियांच्या यंत्रसामग्रीच्या किमतीवर र्निबध नसल्याने रुग्णांची लूट होत आहे.

औषध दरनियामक प्राधिकरणाकडून आकडेवारी जाहीर

गुडघ्याच्या शस्त्रक्रियांमधील कृत्रिम यंत्रसामग्रीत ३१३ टक्क्यांपर्यंत रुग्णांची लूट केली जात असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रीय औषध दरनियामक प्राधिकरणाने या यंत्रसामग्री तयार करणाऱ्या कंपन्या, वितरक, रुग्णालय यांच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नफेखोरी करण्याच्या या प्रकाराबद्दल प्राधिकरणाने सूचना व हरकती मागविल्या आहेत.

अपघात किंवा वयोवृद्धांमध्ये मोठय़ा प्रमाणात गुडघ्याची वाटी बदलण्यासाठी रोपण शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया सर्वसाधारण रुग्णालयात होत नसल्याने खासगी रुग्णालयातून या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने हृदय शस्त्रक्रियांमधील कॅथेटर व स्टेण्टमधील नफेखोरी उघड केल्यानंतर राष्ट्रीय औषध दरनियामक प्राधिकरणाने गुडघे रोपण शस्त्रक्रियांमधील नफेखोरी समोर आणली आहे. या शस्त्रक्रियेतील यंत्रसामग्रीचे वितरक व रुग्णालये मूळ किमतीपेक्षा ३१३ टक्क्यांपर्यंत किंमत वाढवून रुग्णांची लूट करीत आहेत. संपूर्ण गुडघारोपण शस्त्रक्रियेसाठी ६५,७८२ रुपयांची यंत्रसामग्री रुग्णालयांकडून ४,१३,०५९ रुपयांना विकली जाते. ही संख्या मूळ किमतीच्या सहापट जास्त आहे. यामध्ये आयातदाराचा नफा ७६ टक्के व रुग्णालयाचा नफा १३५ टक्के असल्याचे प्राधिकरणाच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.

गुडघ्याच्या सांध्यांच्या रोपणासाठी (टिबिअल प्लेट) मूळ किंमत १७,४९२ रुपये असून रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी १,२२,३३६ रुपये आकारले जातात. काही हजारांमध्ये होणाऱ्या या शस्त्रक्रियांसाठी रुग्णालये लाखोंमध्ये पैसे आकारतात. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार माडीच्या हाडांची शस्त्रक्रिया १०,६१५ हजारांवरून २९,४७० पर्यंत पोहोचली आहे. तर गुडघ्याच्या वाटीची किंमत ११७८ वरून ४ हजार इतक्या महागात विकली जाते.

‘पालिकेतील शस्त्रक्रिया गरिबांना परवडतील’

परदेशातून येणाऱ्या गुडघे शस्त्रक्रियांच्या यंत्रसामग्रीच्या किमतीवर र्निबध नसल्याने रुग्णांची लूट होत आहे. यावर राज्य सरकारने गांर्भीयाने दखल घेत जास्त पैसे आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे जनआरोग्य अभियानाचे डॉ. अभिजीत मोरे यांनी सांगितले. तर पालिका रुग्णालयात गुडघे रोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या तर गरीब रुग्णांना सोईचे ठरेल, असेही डॉ. मोरे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-08-2017 at 04:06 IST