नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालय

मंत्रिमंडळाची मान्यता

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रूग्णालय सुरु करण्यास बुधवारी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

लोकसंख्येत झालेली वाढ आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत तसेच आरोग्य सुविधेबाबत निर्माण झालेली जागरुकता लक्षात घेऊन नाशिकला नवीन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नाशिक जिल्ह्यतीलअपुऱ्या वैद्यकीय सुविधांचा विचार करून या जिल्ह्यत देखील अतिविशेषोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. नाशिक येथे १९९९ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. या विद्यापीठास राज्यातील सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाचे महाविद्यालय संलग्नीत आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत अध्यापन व संशोधन तसेच अतिविशेषोपचार सेवा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात आले असून हे महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे ६२७ कोटी ६२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्नित या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन करण्यास तसेच त्यामध्ये १५ विषयांमध्ये एकूण ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा निर्माण करण्यास देखील मान्यता देण्यात आली. हे वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय पूर्णत: स्वायत्त संस्था असणार आहे.

या महाविद्यालय व रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक जागा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरामध्ये उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमाच्या तरतूदीनुसार अभ्यासक्रमांचे व इतर शुल्क निश्चित करून आकारणी करण्यास देखील यावेळी मान्यता देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hospital with medical college in nashik abn