मुंबई : सर्व वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये रुग्ण सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनविण्यासाठी आता रुग्णालयांमध्ये ‘रुग्ण सुरक्षा कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी स्वतंत्र रुग्ण सुरक्षा समन्वय अधिकाऱ्याची नियुक्तीही करण्यात येणार आहे.भारतात वैद्यकीय उपचारात होणाऱ्या चूका, संसर्ग आणि निदान विलंबाच्या घटनांमुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

देशात दरवर्षी वैद्यकीय चूका आणि उपचारादरम्यानच्या संसर्गामुळे सुमारे ५२ लाख गंभीर घटना घडतात. या पार्श्वभूमीवर उपचाराचा दर्जा सुधारणे, उपचाराचा खर्च कमी करणे आणि रुग्णांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ‘रुग्ण सुरक्षा कक्ष’ स्थापन करणे आणि ‘रुग्ण सुरक्षा समिती’ स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयाची अमलबजावणी करण्याच्या सूचना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय संस्थांना दिले आहेत. त्यानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य, संचालक आणि प्रमुखांनी महाविद्यालये, तसेच संलग्न रुग्णालयासाठी रुग्ण सुरक्षा समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. याशिवाय, संबंधित वैद्यकीय शाखा आणि रुग्ण सुरक्षा क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश असलेली रुग्ण सुरक्षा समिती किंवा कक्ष स्थापन करायचा आहे.

‘रुग्ण सुरक्षा समन्वय अधिकारी’ म्हणून नियुक्त करण्यात येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे रुग्णालयातील रुग्ण सुरक्षेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची क्षमता आणि अधिकार असतील. तसेच महाविद्यालयाचे संचालक किंवा रुग्णालय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली ‘रुग्ण सुरक्षा समिती” स्थापन केली जाणार असून, त्यात सर्व संबंधित विभागांचे प्रतिनिधी समाविष्ट असतील.

उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी

या कक्षाच्या माध्यमातून संस्थेमध्ये रुग्ण सुरक्षेसाठी निश्चित केलेल्या पद्धती, कार्यप्रणाली आणि प्रमाणित कार्यसूचनांची अंमलबजावणी करणे, त्यावर देखरेख ठेवणे आणि ठरावीक कालावधीनंतर त्यांचा आढावा घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे रुग्णालयांमधील रुग्ण सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत होणार आहे.

उपचारांचा दर्जा सुधारण्यावर भर

आरोग्य सेवा संस्थांमध्ये रुग्ण सुरक्षेला प्राधान्य दिल्यामुळे उपचारांचे परिणाम सुधारण्यास, उपचारांशी संबंधित टाळता येण्याजोगा खर्च कमी करण्यास आणि रुग्णांचे समाधान वाढविण्यास मदत होईल, असे या उपक्रमामागील उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यावरही भर देण्यात आला आहे.

या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित

  • औषध सुरक्षा आणि शस्त्रक्रिया सुरक्षा.
  • रक्त संक्रमण सुरक्षा आणि वैद्यकीय उपकरण सुरक्षा.
  • प्रयोगशाळा व निदान सुरक्षा.
  • संसर्ग नियंत्रण आणि प्रतिजैविक प्रतिरोधकता.
  • रुग्ण सुरक्षा संशोधन आणि रुग्ण-कुटुंब सहभाग.
  • लसीकरण व इंजेक्शन सुरक्षा.
  • जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, अग्निसुरक्षा, संरचनात्मक व पर्यावरण सुरक्षा यांसारख्या सुविधा सुरक्षा बाबी.