मुंबई : केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) खार येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक कुणाल जानी याला कोकेन तस्करीप्रकरणी गेल्या वर्षी दाखल केलेल्या गुन्ह्यांत गुरुवारी अटक केली. अभिनेता अर्जुन रामपाल याच्या प्रेयसीचा भाऊ अ‍ॅगिसिलाऊस डेमेट्रीअ‍ॅडेट्सलाही गेल्या वर्षी एनसीबीने या प्रकरणात अटक केली होती.

तसेच चित्रपटसृष्टीशी संबंधित क्षितिज प्रसाद यालाही एनसीबीने याच प्रकरणात गेल्या वर्षी अटक केली होती. आरोपीच्या जबाबात जानीचे नाव उघड झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले. या प्रकरणी गेल्या वर्षी एका नायजेरियन नागरिकाकडून कोकेन जप्त करण्यात आले होते. ईडीच्या प्रकरणातही त्याचे नाव आले होते. दरम्यान, जानीकडून कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले नाहीत. केवळ जुन्या आरोपींच्या जबाबात त्याचे नाव आल्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सुशांत सिंह यांच्या प्रकरणात एनसीबीने चित्रपटसृष्टीतील अनेक तारकांची चौकशी केली होती. त्या प्रकरणातही त्याचा सहभाग तपासला जाणार आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नायजेरियन नागरिक उका उमेका ऊर्फ गॉडवीन याला चार ग्रॅम कोकेनसह अटक केली होती. तो पाली हिल, अंधेरी, जुहू व खार परिसरातील नागरिकांना अमली पदार्थ पुरवत होता.

लोणावळा येथे डेमेट्रीअ‍ॅडेट्स राहत असलेल्या घरावर छापा टाकला. तेथे तो त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता. त्याच्याकडून ०.८ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्या खार येथील घराचीही झडती घेण्यात आली. तेथे अलफ्रॅझोलन गोळ्यांची एक स्ट्रीप सापडली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. याशिवाय एनसीबीच्या एका पथकाने क्षितिज रवी प्रसाद यालाही यापूर्वी एनसीबीने अटक केली होती.