मुंबई : ‘उच्च व तंत्रशिक्षण विभागा’अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठांमध्ये, सरकारी व अनुदानित महाविद्यालयांमध्ये पदवी-पदव्युत्तर स्तरावर तासिका तत्त्वावर शिकविणाऱ्या अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. प्रति तासिका १२५ ते १५० रुपयांची वाढ दिल्याने या अध्यापकांना दिलासा मिळाला आहे.

व्याख्यात्यांची हजारो पदे रिक्त असल्याने महाविद्यालयांना तासिका तत्त्वावर अध्यापक नेमून अध्यापन सुरू ठेवण्याची मुभा आहे. २००८ साली त्याकरिता सरकारने मानधन ठरवून दिले. त्यावेळी ते १५० ते ३०० रुपये प्रति तासिका असे होते. २०१८ नंतर यात ५० ते २०० रुपये इतकी वाढ करण्यात आली. अनेक महाविद्यालयांमध्ये नियमित अध्यापकांची कामेही तासिका तत्त्वावरील अध्यापकांकडून करून घेतात. त्यामुळे मधल्या काळात तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन वाढवून देण्यात यावे, या मागणीने जोर धरला. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मानधन वाढवून देण्याकरिता समिती नेमली. या समितीच्या अहवालानंतर आता पुन्हा एकदा आढावा घेत राज्य सरकारने सुधारित मानधन ठरवून दिले आहे.

यानुसार कला, वाणिज्य, विज्ञान या पदवी अभ्यासक्रमाकरिता शिकविणाऱ्यांना प्रति तासिका ६२५ तर प्रात्यक्षिकांकरिता २५० रुपये इतके मानधन मिळेल. तर पदव्युत्तरसाठी ते ७५० रुपये आणि प्रात्यक्षिकांकरिता ३०० रुपये असेल. शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षण पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता ७५० आणि प्रात्यक्षिकांसाठी ३०० रुपये मानधन मिळेल. विधि शाखेच्या दोन्ही अभ्यासक्रमांकरिताही इतकेच मानधन ठरविण्यात आले आहे.

विभागाअंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या अधिव्याख्यातांच्या मानधनातही सुधारणा करण्यात आली आहे. तेथील प्रशिक्षित अधिव्याख्याताला आता प्रतितास ७२ ऐवजी १५० रुपये इतके मानधन मिळेल. तर अप्रशिक्षित अधिव्याख्याताला ५४ ऐवजी १२० रुपये मानधन मिळेल. येत्या १ ऑक्टोबरपासून सुधारित मानधन लागू राहील.