|| निशांत सरवणकर

लोखंड, सिमेंटच्या दरात वाढ सुरूच

मुंबई : बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंड, सिमेंट तसेच इतर साहित्यात गेल्या दोन वर्षांत चढउतार सुरू होता. मात्र गेल्या काही महिन्यांत सतत वाढ होत असल्यामुळे बांधकामाच्या प्रति चौरस फुटांच्या दरावरही परिणाम झाला आहे. या वाढीमुळे घरांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असे विकासकांचे म्हणणे आहे.

करोनाच्या सावटातून बांधकाम व्यवसाय बऱ्यापैकी सावरला आहे. मुद्रांक शुल्कात सवलत नसतानाही यंदा गेल्या दोन महिन्यांत विशेषत: दिवाळीत घरविक्रीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. त्यामुळे एकीकडे विकासकांची रोकडसुलभता वाढू लागलेली असतानाच लोखंड, सिमेंटसह इतर बांधकाम साहित्यातील वाढीमुळे आता ते चिंतेत आहेत. विकासकांची संघटना असलेल्या महाराष्ट्र चेंबर्स ऑफ र्हौंसग इंडस्ट्रीज- कॉन्फर्डेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एमसीएचआय-क्रेडाई) गेल्या वर्षभरापासून लोखंड व सिमेंटच्या वाढत्या किमतीकडे लक्ष वेधले होते. या किमती नियंत्रित करण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. परंतु त्या दिशेने केंद्र सरकारने काहीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे अखेरीस हा वाढीव खर्च भरून काढण्यासाठी घरांच्या किमती वाढविण्याखेरीज पर्याय नाही, असे मत नरेडको महाराष्ट्रचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप रुणवाल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, लोखंड सिमेंटसह तांबे व अ‍ॅल्युमिनियमच्या किमतीही वाढल्या आहेत. त्याचा परिणाम बांधकाम खर्चावर होत आहे. येत्या भविष्यात किमती कमी न झाल्यास, १० ते १२ टक्क्यांच्या जवळ खर्च वाढण्याची शक्यता आहे. याचा भार खरेदीदारांवर टाकला जाऊ शकतो. त्याचा परिणाम घरांच्या विक्रीवर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

घरबांधणीत वापरात येणारे प्लास्टिक, रेसीन्स, इन्स्युलेशन सामान आदींच्या किमतीही मागील काही महिन्यात भरमसाट वाढल्या आहेत. करोनामुळे कच्चा मालाच्या किमतीत आणखी झालेली वाढ व व्यापाऱ्याकडील अपुरा पुरवठा आदी विकासकांपुढे आव्हाने आहेत, असे मत एमसीएचआय-क्रेडाईचे सचिव प्रीतम चिवुकुला यांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत घरांच्या किमती वाढलेल्या नाहीत. करोनामुळे बांधकामांमध्ये अडथळे आले. मजुरांचे स्थलांतर व प्रवासी निर्बंधामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला होता. तरीही या क्षेत्राने घर खरेदीदारांवर ओझे न टाकता आपली भूमिका बजावली. कच्च्या मालाच्या किमतीतील सतत होणारी वाढ अशीच सुरू राहिल्यास विकासकांचीही पंचाईत होईल, असे मत एन रोझ डेव्हलपर्सचे गौरव पुरोहित यांनी व्यक्त केले.

लोखंड, सिमेंट आदींच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची तात्काळ आवश्यकता आहे, असे मत सीआर रिअल्टीचे चेराग रामकृष्णन यांनी व्यक्त केले. नजीकच्या भविष्यात कच्च्या मालाच्या किमती स्थिर होतील, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे घरांच्या किमतीत वाढ करण्यावाचून पर्याय राहणार नाही व कमी व्याजदरामुळे घर खरेदीत होणारी ग्राहकांची बचत यामुळे व्यर्थ ठरेल, असे प्रेसकॉन ग्रुपचे विनय केडिया यांनी सांगितले.