scorecardresearch

संक्रमण शिबिरांतील साडेतीन हजार घरे विकासकांच्या ताब्यात

जुनी वा मोडकळीस आलेली इमारत रिकामी करायची म्हटली तर म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे सध्या फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या सदनिका उपलब्ध आहेत.

अनेक वर्षांपासून परत करण्यास टाळाटाळ; म्हाडाचे १०० कोटींचे भाडेही थकीत

मुंबई : जुनी वा मोडकळीस आलेली इमारत रिकामी करायची म्हटली तर म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे सध्या फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या सदनिका उपलब्ध आहेत. सुमारे सात हजार संक्रमण सदनिकांपैकी साडेतीन हजार सदनिका अद्यापही विकासकांच्या ताब्यात आहेत. या विकासकांनी या संक्रमण सदनिकांच्या भाडयमपोटी म्हाडाचे शंभर कोटी रुपये थकविले आहेत.

जुन्या साडेचौदा हजार इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने अलीकडेच धोरणात सुधारणा केली आहे. या इमारतींचा पुनर्विकास करण्याचे ठरवले गेले तर या रहिवाशांच्या पर्यायी निवासासाठी म्हाडाकडे सदनिका उपलब्ध नाहीत. म्हाडाच्या अखत्यारीतील ५८ संक्रमण शिबिरात १२ हजार १४७ सदनिका होत्या. यापैकी २० संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास केल्यानंतर ही संख्या सात हजार ७३७ इतकी झाली आहे. त्यातही चार हजार १३१ संक्रमण सदनिका पुनर्विकास करणाऱ्या विकासकांना भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. त्यापैकी म्हाडाला फक्त ७८० सदनिका परत मिळाल्या आहेत. उर्वरित तीन हजार ३५३ सदनिका विकासकांच्या ताब्यात आहेत. या सदनिकांच्या भाडयमपोटी विकासकांनी जुलै २०२० पर्यंत २०० कोटी रुपये इतके भाडे थकवले होते. मात्र इमारत व दुरुस्तीमंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी पाठपुरावा करून यापैकी १०९ कोटी भाडे वसूल करण्यात यश मिळविले. मात्र ही बाब संबंधित म्हाडाच्या वसुली अधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही, असे आढळून आले आहे.

म्हाडाच्या बहुतांश संक्रमण सदनिका विकासकांकडे असल्या तरी त्याचा तपशील म्हाडाकडे उपलब्ध नव्हता. आपण पाठपुरावा करून तो उपलब्ध करून घेतला. तेव्हा अनेक विकासकांकडे वर्षांनुवर्षे सदनिकांचा ताबा असल्याचे लक्षात आले. आता या सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश इमारत व दुरुस्ती मंडळाला देण्यात आले आहेत .

– विनोद घोसाळकर, सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Houses transit camps possession developers ysh

ताज्या बातम्या