एमएमआरडीएने निविदा रद्द करावी : आव्हाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मिठागरांच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ देणार नाही असे स्पष्ट करीत  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बृहत आराखड्याला विरोध केला आहे. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आराखड्याची निविदा त्वरित रद्द करावी अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. पण एमएमआरडीएने मात्र सावध भूमिका घेत राज्य सरकारकडून लेखी आदेश आल्यानंतर निर्णय घेऊ असे स्पष्ट केले आहे.

मिठागरांच्या जागेवर परवडणारी घरे बांधण्याच्यादृष्टीने अभ्यास करण्यासाठी, तसेच जागेच्या विकासाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठीच्या निविदेला तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला. आता आव्हाड यांच्यासह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मिठागराच्या जागेवरील बांधकामास विरोध केला आहे. कोणत्याही प्रकारचे बांधकाम मिठागरावर होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर आता एमएमआरडीएचा आराखडाही बासनात गुंडाळला जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशात शुक्रवारी आव्हाड यांनी एक ट्विट करत महानगर आयुक्तांनी आराखड्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी केली आहे.

या संदर्भात राज्य सरकारकडून आदेश आल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी स्पष्ट केले आणि या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housing minister jitendra awhad opposition construction salt flats mmrda nationalist congress shiv sena akp
First published on: 22-01-2022 at 01:20 IST