म्हाडाच्या ८,२०० सदनिकाधारकांचे पुनर्वसन मार्गी

१४ हजार गाळे विक्रीसाठी तयार -जितेंद्र आव्हाड

१४ हजार गाळे विक्रीसाठी तयार -जितेंद्र आव्हाड

मुंबई : गेल्या काही महिन्यात म्हाडाच्या प्रकल्पांना गती दिल्याने ८,२०० म्हाडा सदनिकाधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असून १४ हजार गाळे नव्याने विक्रीसाठी तयार होणार आहेत. यामुळे म्हाडाच्या गंगाजळीतही २,०३४ हजार कोटींची भर पडली आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा आणि झोपुच्या योजनांचा आढावा घेताना बुधवारी ही माहिती दिली.

२५ महिन्यात म्हाडाकडे  ५८५ कोटी रुपयांचा अधिमुल्य महसूल जमा झाला. परंतु, १४ जानेवारी ते १९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत नवीन १८२ व जुने १७३ अशा एकूण ३५५ संस्थांना देकार पत्र जारी करण्यात आले असून १,११४ कोटी रुपये इतका विक्रमी महसूल जमा झाला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. २०१७ पासून म्हाडाच्या तिजोरीत जमा झालेल्या २,०३४ कोटी निधीमुळे बीडीडीचाळींसारख्या प्रकल्पांना चालना देणे शक्य होईल, असे आव्हाड यांनी सांगितले.

२०१७पासून ३५५ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सुमारे ८,५२० मुळ सभासदांचे पुनर्वसन होऊन ४५ चौ.मी. चटई क्षेत्रफळाचे अंदाजे १४ हजार विक्री गाळे म्हाडाच्या विविध वसाहतींमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील २-३ वर्षांंमध्ये साधारणत: २५ हजार  घरे उपलब्ध होणार असल्यामुळे बांधकाम उद्योगातील विविध घटकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

झोपु योजनेतही २०१९-२० या वर्षांत ८,६०२, २०२०-२१ मध्ये १३,८७५ तर एप्रिल २०२१ ते आजतागायत ५,६८५ सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे व ९२ हजार लोकांना याचा फायदा झाल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

सरकारच्या तिजोरीतही भर

म्हाडाच्या विक्री गाळ्यांचे मुद्रांक शुल्क खरेदीदारांऐवजी विकासकामार्फत भरायचे आहेत. १४ हजार गाळ्यांची अंदाजित किंमत प्रत्येकी ७५ लाख गृहीत धरली तरी त्यावरील ५ टक्के मुद्रांक शुल्क मोजता ५२५ कोटी सरकारच्या तिजोरीत येतील, असा अंदाज आव्हाड यांनी व्यक्त केला.

झोपुचे रखडलेले २३० प्रकल्प पूर्ण करणार

झोपुचे २३० रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. ११ प्रकल्प न्यायालयीन तंटय़ात आहेत. तर अन्य काही प्रकल्प सीआरझेड, एसओईएफच्या जमिनीवर असल्याने वादात आहेत. परंतु, २३० प्रकल्प लगेचच पूर्ण करता येण्यासारखे असल्याने त्यावर भर दिला जाणार आहे.

जानेवारी, २०२२मध्ये मुंबईकरांसाठी सोडत

मुंबईतील घरांसाठी गेली दोन-तीन वर्षे लॉटरी न निघाल्याने निराशा झालेल्यांना गृहनिर्माण मंत्र्यांनी आशेचा किरण दाखवला. जानेवारी, २०२२मध्ये मुंबईतील घरांसाठी लॉटरी काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Housing minister jitendra awhad reviews mhada and sra schemes zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या