अकरावीचे प्रवेश रद्द करण्यासाठी नियमावली

४ सप्टेंबरपासून दुसरी खास फेरी

प्रवेश रद्द केल्यास पुन्हा प्रवेश नाही; ४ सप्टेंबरपासून दुसरी खास फेरी

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांनी इथून पुढे प्रवेश रद्द केले तर त्यांना केंद्रीय प्रवेश प्रकियेतून बाद करण्यात येईल आणि मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही महाविद्यालयांमध्ये पुन्हा प्रवेश मिळणार नाही, असे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शुक्रवारी काढले. बेटरमेंटसाठी आधी घेतलेले प्रवेश रद्द करणे आणि नवीन फेरीमध्ये सहभागी होणे ही पळवाट बंद करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने हा बडगा उगारला आहे.

दरम्यान, अकरावीच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वानुसार राबविण्यात येणाऱ्या फेरीनंतर आता दुसऱ्या खास फेरीचे आयोजन येत्या ४ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या दहावीच्या फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले सुमारे ५ हजार विद्यार्थी आणि आत्तापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश निश्चित करू न शकलेले विद्यार्थी यांच्यासाठी या प्रवेशफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील चार प्रवेश फेऱ्या व एक खास फेरी राबविल्यानंतरही प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वानुसार प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली. परंतु या फेरीमध्येही अनेक विद्यार्थी प्रवेश निश्चित करू शकलेले नाहीत. तसेच जुलै महिन्यात झालेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकालही नुकताच जाहीर झाला आहे. मुंबई महानगर प्रदेशातून ५४०७ विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. येत्या ४ ते ७ सप्टेंबर या काळात प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उर्वरित विद्यार्थ्यांसाठी दुसरी खास फेरी आयोजित केली आहे.

महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करण्याबाबतच्या वारंवार सूचना देऊनही बरेच विद्यार्थी केवळ बेटरमेंटसाठी महाविद्यालयातील प्रवेश रद्द करुन नवीन प्रवेश देण्याची मागणी करत आहेत. तेव्हा दुसऱ्या खास फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी आधी घेतलेले प्रवेश रद्द करून सहभागी होऊ नये यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रवेश रद्द करणाऱ्यासाठी नियमावलीच जाहीर केली आहे. मुंबई महानगर क्षेत्र वगळून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आणि अकरावीऐवजी आयटीआय, डिप्लोमा आदी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाच केवळ प्रवेश रद्द करण्याची मुभा असणार आहे.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात निश्चित केलेले प्रवेश रद्द केल्यास त्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी होता येणार नाही. तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करायचा असेल तर प्रवेश रद्द करण्याचे कारण नमूद असलेले हमीपत्र आणि लेखी अर्ज देणे बंधनकारक असणार आहे. तसेच कनिष्ठ महविद्यालयातून प्रवेश रद्दची संगणीकृत पावती जोपर्यंत विद्यार्थ्यांना मिळणार नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द झाला असे समजण्यात येणार नाही. तेव्हा कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश रद्द केल्याची संगणीकृत पावती देणे बंधनकारक असणार आहे.

अकरावीचे प्रवेश रद्द करण्याबाबत सूचना

  • मुंबई महानगर क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी किंवा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी मिळालेला प्रवेश रद्द करण्याची अनुमती देण्यात येईल.
  • महाविद्यालयात निश्चित केलेले प्रवेश रद्द केल्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी होता येणार नाही.
  • प्रवेश रद्द करण्याचे कारण नमूद असलेले हमीपत्र आणि लेखी अर्ज देणे बंधनकारक
  • महाविद्यालयांनी प्रवेश रद्द केल्याची संगणीकृत पावती देणे बंधनकारक

दुसऱ्या खास फेरीचे वेळापत्रक

  • २ सप्टेंबर – रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध
  • ४ ते ७ सप्टेंबर – ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग १ व २ भरणे
  • ८ सप्टेंबर – दुसऱ्या खास फेरीची जागा वाटप यादी जाहीर
  • ८ ते ११ सप्टेंबर – महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: How can canceled fyjc admission process