How Mumbai Mayor is Elected : राज्यातील २९ महानगरपालिकांची निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. तर मतमोजणी ही १६ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून सध्या जोरदार प्रचार केला जात आहे. याबरोबरच मुंबई महानगरपालिकेत नेमक्या कोणत्या पक्षाचा महापौर होणार याबद्दलही सध्या सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. आज आपण निवडणूक निकालानंतर मुंबई महानगरपालिकेत महापौर कसा निवडला जातो याबद्दल जाणून घेणार आहोत.
मुंबई महानगरपालिकेत प्रभाग निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष निवडून आलेले २२७ नगरसेवकांचा समावेश होतो. २२७ प्रभागांमधून नागरिक मतदानाच्या माध्यमातून आपल्या प्रभागातून एक नगरसेवक निवडून देतात. ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून येतात, त्या पक्षाचा महापौर होतो. महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडणुकीकरीता, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिली विशेष सभा घेण्यात येते.
महापौरांच्या निवडीवेळी आरक्षण हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरतो. हे पद दरवेळी खुल्या प्रवर्गासाठी नसते. आरक्षणाच सोडत काढून महापौर पदासाठी आरक्षण निश्चित केले जाते. हे पद अनुसूचित जाती – (पुरुष/महिला), अनुसूचित जमाती- (पुरुष/महिला), मागास प्रवर्ग – (पुरुष/महिला), खुल्या प्रवर्गातील महिला आणि खुला प्रवर्ग यासाठी आरक्षित केले जाते.
सर्वसाधारण निवडणुकीनंतर महानगरपालिकेने त्यांच्या पहिल्या विशेष सभेत नगरसेवकांमधून एकाची महापौर आणि दुसऱ्याची उपमहापौर म्हणून निवड केली जाते. ज्या प्रवर्गासाठी पद आरक्षित आहे, त्याच प्रवर्गातील निवडून आलेला नगरसेवक या पदासाठी अर्ज भरू शकतात. महापालिकेच्या पहिल्या सभेमध्ये उपस्थित सर्व नगरसेवक मतदान करतात. मुंबई महापालिकेत ही निवडणूक ‘हात उंचावून’ पद्धतीने पार पडते.
महापौरांचा कार्यकाळ
निवडून आलेले महापौर हे त्या शहराचे पहिले नागरिक असतात. दरम्यान महानगरपालिकेचा कालावधी तिच्या पहिल्या सभेपासून ५ वर्षाचा असतो. तर नगरसेवकांचा कार्यकाळ हा महानगरपालिकेच्या कालावधी इतका असतो. तर महापौरांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा (२.५ वर्षे) असतो. पाच वर्षांच्या महापालिका कार्यकाळात दोन वेळा महापौरांची निवड केली जाते.
