Bhandup BEST Bus Accident: मुंबई उपनगरातील भांडुप रेल्वे स्थानकाच्या बाहेर भरधाव बेस्ट बसने पादचाऱ्यांना धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (२९ डिसेंबर) घडली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर आठ ते दहाजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेस्ट बसचालक संतोष सावंत (५२) याला अटक केली. त्याच्या चौकशीतून आता या अपघातामागचे कारण समोर आले आहे.
भांडुप पश्चिम स्थानकाबाहेरील बेस्ट डेपो परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. डेपोमधून बस बाहेर येत असताना चालकाचा बसवरील ताबा अचानक सुटला व बसने पदपथावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना धडक दिली. रेल्वे स्थानक परिसर असल्याने घटनेच्या वेळी तेथे पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. त्यामुळे अपघातात दहा ते बारा पादचारी जखमी झाले. त्यांना तात्काळ मुलुंड येथील अगरवाल रुग्णालयात नेण्यात आले.
चालकाने चौकशीत काय सांगितले?
पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आधीच्या चालकाने इलेक्ट्रिक बस न्यूट्रल मोडमध्ये ठेवण्याऐवजी ड्राईव्ह मोडवर ठेवली होती. अटकेत असलेले चालक संतोष सावंत यांना मंगळवारी पोलिसांनी न्यायालयात सादर केले असता त्याला ३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाची ड्युटी बदलल्यानंतर अटकेत असलेले चालक संतोष सावंत यांनी बसचा ताबा घेतला. त्यांनी हँडब्रेक खेचून बस सुरू केली. तसेच बस न्यूट्रल मोडमध्ये असल्याचे समजून ॲक्सिलरेटर दाबला.
… तर मृतांची संख्या वाढली असती
भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितले की, सावंत यांनी बस वेगात पुढे गेल्यानतंर ती उजवीकडे पोलीस ठाण्याच्या दिशेने वळवली. जर बस न वळवता तशीच पुढे गेली असती तर त्याखाली रस्त्यावरील ५० ते १०० लोक चिरडले जाण्याची शक्यता होती. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती होती.
संतोष सावंत हे काही वर्षांपासून बेस्टमध्ये चालक म्हणून काम करत आहेत. तर तीन महिन्यांपासून ते बेस्टच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बस चालवत आहेत. बेस्ट बस नेमकी नियंत्रणाबाहेर कशी गेली, हे समजून घेण्यासाठी पोलिसांना सदर घटना चालकाकडून प्रत्यक्ष बघायची असल्यामुळे चालकाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
अपघात झालेली बस पोलिसांनी आरटीओमध्ये पाठवली आहे. या बसमध्ये कोणती तांत्रिक समस्या होती का? याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच सावंत यांनी केलेल्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आधीच्या शिफ्टमधील चालकाचीही चौकशी केली जाणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
