सालाबादप्रमाणे यंदाही बारावी परीक्षेच्या तोंडावर उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्काराचे अस्त्र उपसत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या मागण्यांकरिता राज्य सरकारवर दबाव आणण्याचा निर्णय घेतला आहे.
‘महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण महासंघा’ने वर्षभरात अनेक आंदोलने केली. मात्र सरकारकडून प्रतिसाद मि़ळालेला नाही. येत्या ८ दिवसात संघटनेसोबत चर्चा करून मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीस असहकार करण्यात येईल व रोज प्रत्येक परीक्षक केवळ एक पेपर तपासेल, असा इशारा महासंघाने दिला आहे. परीक्षा मात्र सुरळीतपणे पार पडेल. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून कोणताही ताण न घेता परीक्षा द्यावी, असे आवाहनही केले आहे.