मुंबई : मुंबई विभागाचा बारावीच्या परीक्षेचा निकाल ९०.०८ टक्के लागला आहे. राज्याच्या निकालाप्रमाणेच मुंबई विभागाच्या निकालातही मोठी घरसरण झाली आहे. यंदा मुंबईचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २.८५ टक्क्यांनी घटला आहे. मुंबईच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे.
गेल्या वर्षी (२०२५) बारावीचा निकाल ९२.९३ टक्के लागला होता. या परीक्षेसाठी मुंबई विभागातून ३ लाख ५ हजार ११८ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. यापैकी ३ लाख १४ हजार १४४ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी २ लाख ९१ हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या तुलनेत २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी मुंबई विभागातून ३ लाख २४ हजार ७३९ विद्यार्थांनी नोंदणी केली होती.
यामध्ये १ लाख ६५ हजार ९३३ मुले, तर १ लाख ५८ हजार ८०६ मुलींचा समावेश होता. यापैकी ३ लाख २३ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १ लाख ६५ हजार २३० मुले, तर १ लाख ५८ हजार २७१ मुलींचा समावेश होता. परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९१ हजार ४१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १ लाख ४५ हजार ४०२ मुले, तर १ लाख ४६ हजार १३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८७.९९ टक्के असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.२५ टक्के आहे.
मुंबई विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल ९५.६४ टक्के लागला आहे. बारावी परीक्षेला १ लाख २३ हजार ११५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख १७ हजार ७५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ९४.९७ टक्के मुले, तर ९६.४० टक्के मुली आहेत. गतवर्षी विज्ञान शाखेचा निकाल ९६.३३ टक्के लागला होता. या निकालाच्या तुलनेत यंदा मुंबईच्या विज्ञान शाखेच्या निकालात ०.६९ टक्क्यांनी घट झाली आहे. तर वाणिज्य शाखेच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ५.६१ टक्क्यांनी घसरण झाली आहे. वाणिज्य शाखेतून १ लाख ५६ हजार ९०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ३६ हजार ४७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ६९ हजार ९४४ मुले तर ६६ हजार ५३० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
कला शाखेची मुले हुशार
निकालात घसरण झाली असली तरी मुंबई विभागाच्या कला शाखेच्या निकालात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कला शाखेचा निकाल ८४.६३ टक्के लागला होता. तर यंदा कला शाखेच्या निकालात किंचित वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा ०.५६ टक्के वाढ झाली आहे.
