मुंबई : मुंबई विभागाच्या बारावीच्या निकालात घट होण्याबरोबरच ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. परिणामी, कट ऑफही कमी होण्याची शक्यता असून याचा ‘एफवाय’च्या प्रवेशावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई विभागाचा निकाल यंदा ९०.०८ टक्के इतका लागला. गतवर्षी बारावीचा निकाल ९२.९३ टक्के लागला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २.८५ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली तरी निकालात घसरण झाली आहे.

यावर्षी ३ लाख २३ हजार ५०१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले, गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या सुमारे ९ हजारांनी अधिक होती. मात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली तरी निकालावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसला नाही. तसेच उच्च गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांचीही घसरण झाली आहे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षी ४२ हजार ४८१ इतकी होती.

यंदा ती घटून ३९ हजार २९ वर आली असून तब्बल ३ हजार ४५२ विद्यार्थ्याची संख्या कमी झाली आहे. याचबरोबर प्रथम श्रेणी (६० टक्क्यांहून अधिक) मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही २ हजार ७१६ ने कमी झाली आहे. यावरून एकूणच उच्च गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांचा स्तर खाली आल्याचे दिसून येते.

एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्याही किंचित घटली आहे. गेल्या वर्षी २ लाख ९१ हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर यंदा ही संख्या २ लाख ९१ हजार ४१५ इतकी आहे. म्हणजेच निकालात वाढ होण्याऐवजी प्रत्यक्षात घट नोंदली गेली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालयातील ‘एफवाय’ प्रवेशाच्या प्रवेशपूर्व नोंदणीस यापूर्वीच सुरुवात झाली आहे. ही प्रक्रियेला विद्यार्थ्यांनीही प्रतिसाद दिला आहे. मात्र गुणवतांमध्ये घट झाल्याने त्याचा परिमाण नामवंत महाविद्यालयाच्या कट ऑफवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना यंदा प्रवेशाची संधी मिळणार की चुरस होणार हे लवकरच स्पष्ट होईल.