मुंबई : राज्य मंडळाने जाहीर केलेला बारावीच्या निकालामध्ये उत्तीर्णांच्या प्रमाणात यंदा २ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱया विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे. त्यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना चांगले महाविद्यालय मिळण्याची अपेक्षा वाढल्या आहेत. अनेक नामांकित महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) कमी होण्याची शक्यता आहे.

यंदा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ५१० म्हणजेच ०.५ टक्के तर ४५ ते ६० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ४०.५८ टक्के आहे. त्यामुळे यंदा राज्यातील बहुतांश महाविद्यालयांना विद्यार्थी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा राज्य शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान घेतली होती. गेल्या वर्षीही याच सुमारास ही परीक्षा झाली होती. ५ मे रोजी निकाल जाहीर झाला होता.

यंदा राज्य शिक्षण मंडळाने २ मे रोजीच निकाल जाहीर केला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ४४ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील १४ लाख ३३ हजार ५८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रमाण ९.९६ टक्के इतके आहे. यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ५१० इतके आहे. ८५ ते ९० टक्के २३ हजार ९६४, ८० ते ८५ टक्के ४५ हजार २८६, ७५ ते ८० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६७ हजार ४९१ इतकी आहे. यातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा कल व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे अधिक असतो. त्यामुळे यंदा महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये कटऑफमध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी दरवर्षी अटीतटी असते. तेथेही स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे कल वाढला आहे. मात्र यंदा वाणिज्य शाखेतीलही ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण घटल्यामुळे नामांकित महाविद्यालये, स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांनाचे कट ऑफ गुण साधारण दीड ते दोन टक्क्यांनी कमी होऊ शकतील.

यंदा बारावीच्या निकालामध्ये दोन टक्क्यांनी घट झाली असली तरी, ६० ते ७५ टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी ३ लाख ६२ हजार ३३ इतकी आहे. तर ४५ ते ६० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख ८१ हजार ५१९ इतकी आहे. परिणामी यंदा महाविद्यालयांमधील कटऑफ खाली घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.