मुंबई : राज्यातील जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) बसवण्याच्या कामात अपेक्षित प्रगती न झाल्याने परिवहन विभागाने २७ आरटीओ अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांपैकी ५० टक्क्यांहून अधिक वाहनांवर अद्याप एचएसआरपी बसवण्यात आलेली नसलेल्या कार्यालयांतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
परिवहन आयुक्तांनी ३१ जुलै, ४ सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकांमध्ये एचएसआरपी बसवण्याच्या कामाचा वारंवार आढावा घेतला होता. या बैठकांमध्ये संबंधित कार्यालयांना कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुलै २०२६ पासून सातत्याने सूचना देऊनही अपेक्षित सुधारणा झाली नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर झाल्याचे नोटिशीत म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत एचएसआरपी बसवण्याच्या कामात अपेक्षित प्रगती का साधता आली नाही, याबाबत खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास नियमानुसार पुढील कारवाई करण्याचा इशाराही परिवहन आयुक्तांनी दिला. दरम्यान, राज्यातील एचएसआरपी बसवण्याची मोहीम आणि वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्यात आली. १ जुलैपासून सुरू झालेल्या कारवाईत राज्यभरात २.७ लाखांहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एचएसआरपी नसलेली ७१ हजार ८७० वाहने आढळली असून, त्यांच्याकडून सुमारे एक कोटी ३८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना मोटार वाहन कायद्यानुसार एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
राज्यात एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे २.१० कोटी वाहनांपैकी १.१२ कोटी वाहनांवर एचएसआरपी बसवण्यात आली आहे. मात्र, अद्याप मोठ्या संख्येने वाहनांवर ही क्रमांक पाटी बसवणे बाकी आहे. एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, पुनर्नोंदणी आणि हायपोथिकेशनसह काही महत्त्वाच्या आरटीओ सेवांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. उच्च सुरक्षा नोंदणी पाटीमध्ये अशोकचक्राचे होलोग्राम, लेझरद्वारे कोरलेला ओळख क्रमांक आणि पुन्हा वापरता न येणारे लॉक यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. वाहनांच्या क्रमांक पाट्यांमध्ये फेरफार रोखणे आणि वाहनांची ओळख अधिक सुरक्षित व सुलभ करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
