मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) नसलेल्या वाहनांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून, ऑगस्ट महिन्यात चार प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी हजारो वाहनांची तपासणी केली. त्यात सर्वाधिक कारवाई वडाळा प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) केली असून, एका महिन्यात ९०४ वाहने दोषी आढळली.

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनांवर १ जुलैपासून एक हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी ‘एचएसआरपी’ बसवण्यासाठी चार ते पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र ३० जूननंतर सवलत संपुष्टात आली.

चार आरटीओची ऑगस्टमधील कारवाई

ऑगस्ट महिन्यात आरटीओनी ३,२०९ वाहनांची तपासणी केली. बोरिवली आरटीओने ७०८ वाहनांची तपासणी केली असून २९० दोषी वाहनांकडून २.९० लाख रुपये, तर ताडदेव आरटीओने ३५६ दोषी वाहनांकडून ३.५६ लाख रुपये दंड वसूल केला. अंधेरी आरटीओने १,०१२ वाहनांची तपासणी केली असून २०१ दोषी वाहनांकडून ३२ हजार रुपये दंड वसुली केली. वडाळा आरटीओने १,१३३ वाहनांची तपासणी केली असून ९०४ दोषी वाहनांकडून २३ हजार रुपये दंड वसुली केली. ही तपासणी मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले.

‘एचएसआरपी’ का आवश्यक ?

‘एचएसआरपी’ ही वाहनासाठी अद्वितीय आणि छेडछाड-प्रतिरोधक वाहन क्रमांक पाटी असून, त्यावर लेझर कोड, क्रोमियम होलोग्राम आणि कायमस्वरूपी लॉकिंग प्रणाली असते. चोरी, बनावट वाहन क्रमांक पाटी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची मानली जाते. वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची त्वरित ओळख पटविणे, वाहन क्रमांक पाटीमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखण्यासाठी नव्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्यात येत आहे.

‘एचएसआरपी’ नसलेल्या वाहनचालकांना तातडीने अधिकृत केंद्रावरून वाहन क्रमांक पाटी बसवून घ्यावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. तपासणीदरम्यान दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत परिवहन विभागाने स्पष्ट केले.