‘लोकसत्ता’ आरोग्यभान परिसंवादात आरोग्याचा मंत्र उलगडला
आरोग्य हा गंभीर विषय. मात्र रोजच्या अनुभवांचा दाखला देत आणि हलक्या-फुलक्या उदाहरणांमधून आरोग्यतज्ज्ञांनी लोकसत्ता आरोग्यभान परिसंवादातून निरोगी आयुष्याची कथा उलगडली आणि प्रेक्षकांनीही त्याला मनमुराद दाद दिली. अतिखाण्यामुळे भविष्यात जडणारी स्थूलता, जन्मापासून ते पाळी जाण्यापर्यंतचा महिलांचा प्रवास आणि आनंदी जगण्याची सूत्रे याविषयी या परिसंवादात चर्चा झाली. सकाळी मुसळधार पाऊस असतानाही शुक्रवारी ठाण्यात झालेल्या या परिसंवादाला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. आज, शनिवारीही हा कार्यक्रम टिपटॉप प्लाझा येथे होत आहे.
माधवबाग प्रस्तुत लोकसत्ता आरोग्यमान भव या कार्यक्रमात वैद्य अश्विन सावंत यांनी ‘उदर’मतवाद, जे. जे. रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. रेखा डावर यांनी ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी’ आणि केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी ‘जगू आनंदे’ या विषयांवर मार्गदर्शन केले. कनिष्ठ मध्यमवर्ग व निम्नवर्गामध्ये स्थूलता वाढीस लागण्यामागे बेकरीच्या पदार्थाचे अतिसेवन हे प्रमुख कारण आहे. याबरोबरच अतिरिक्त साखर, फास्ट फूड, रात्री उशिरा भरपेट खाणे व अवेळी खाण्याच्या सवयींमुळे स्थूलतेबरोबरच अनेक जीवनशैलीजन्य आजार होतात, असे मत वैद्य अश्विन सावंत यांनी मांडले. अशा ‘लंबोदर मतवादीं’नी केवळ औषधे घेऊन आजार नियंत्रणात ठेवण्याऐवजी आपल्या जीवनशैलीतील चुका आणि आहारातील दोष यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे उपाहारगृहात मेन्यू कार्ड पाहून खाद्यपदार्थ घेण्याऐवजी स्वत:चे ‘हेल्थ कार्ड’ तपासून पाहा, असे म्हणत वैद्य सावंत यांनी प्रेक्षकांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला.
‘जगू आनंदे’ या सत्रात डॉ. पारकर यांनी हिंदी व मराठी कवितांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य जपण्याचे तंत्र सांगितले. त्यांमुळे ‘मे जिंदगी का साथ निभाता चला गया’, ‘आनंदी आनंद गडे’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ अशा गाण्यांचा आस्वाद घेत प्रेक्षकांनी ‘जगू आनंदे’ची अनुभूती घेतली. शास्त्रीय भाषेत मनाची व्याख्या ही मेंदूची कार्यपद्धती अशी असली तरी मनाशिवाय आनंदाचा अनुभव घेता येत नाही, असे सांगताना आनंदी आयुष्यासाठी स्वत:वर प्रेम करण्याचा सल्ला डॉ. पारकर यांनी दिला. जगण्यातील आनंद द्विगुणित करण्यासाठी मैत्रीचे नाते सांभाळा व मनाची लवचीकता असेल तर जगण्यातील कठीण आव्हाने पेलणे शक्य आहे, असेही डॉ. पारकर यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘आनंद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच’ हा आशावाद प्रेक्षकांमध्ये जागृत झाला.
स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी जन्मापासूनच त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहावयास हवे, कारण आजची मुलगी उद्याच्या पिढीला जन्म देणारी माता असते, असे मत डॉ. रेखा डावर यांनी मांडले. सध्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आणि अॅनिमियाचा गंभीर प्रश्न उद्भवत आहे. हे नियंत्रणात आणण्यासाठी महिलांनी पाळण्याची दोरी सांभाळत असताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला त्यांनी उपस्थित महिलांना दिला. सध्या देशात बालमृत्यूचे प्रमाण वाढत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी मातांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कधी?
आज
(सकाळी १० ते दुपारी ३)
कुठे?
टिप टॉप प्लाझा,
एल. बी. एस. मार्ग, ठाणे
विषय
* जगू आनंदे
– डॉ. शुभांगी पारकर
केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभाग प्रमुख
* उदर मतवाद
– वैद्य अश्विन सावंत
आयुर्वेद तज्ज्ञ
* जिच्या हाती आरोग्याची दोरी
– डॉ. रेखा डावर , स्त्रीरोग तज्ज्ञ
आजही कार्यक्रम
प्रवेशिकांसाठी लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प) किंवा टिप टॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, ठाणे (प.) येथे संपर्क साधावा. ऑनलाइन नोंदणीसाठी https://www.townscript.com/e/loksatta-aarogyaman-bhav-thane-401324 या संकेत स्थळाला भेट द्या.
ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे आज सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत होणाऱ्या या परिसंवादासाठी ३० रुपये प्रति व्यक्ती असे शुल्क आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध होतील.
माधवबाग प्रस्तुत लोकसत्ता आरोग्यमान भव हा कार्यक्रम पॉवर्ड बाय तन्वी, पितांबरी, नाना एण्टरप्राइज व शीतल हर्बल असून या कार्यक्रमाला हेल्थ पार्टनर एसआरव्ही ममता रुग्णालय, बँकिग पार्टनर डीएनएस बँक, पॉवर्ड बाय पार्टनर शीतल हर्बल, नो फॉल अॅन्टिस्लीप सॉक्स इंटरप्रायजेस, आणि हॉस्पिटल पार्टनर ज्युपिटर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले आहे.