मुलुंडमधील उच्चभ्रू वसाहतीतील घरातून चार ट्रक, सहा टेम्पो भरून कचरा ‘जप्त’

मुलुंडमधील एका उच्च मध्यमवर्गीय वसाहतीत तीन खोल्यांच्या घरातून पोलिसांनी तब्बल चार ट्रक आणि सहा टेम्पो भरून कचरा बाहेर काढला. घरातील कचरा फेकून न देता साठवून ठेवणाऱ्या विक्षिप्त कुटुंबाने गेल्या १३ वर्षांपासून हा कचरा साठवला होता. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही या कुटुंबाकडून दुर्लक्ष केले गेल्याने शेजाऱ्यांनी अखेर पोलीस आणि महापालिकेला पाचारण केले. त्या वेळी या घराच्या तीन खोल्या कचऱ्यांनी पुरत्या भरल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, अशाच कचऱ्यात ८६ वर्षीय वृद्ध महिला राहात असल्याचे उघड झाले.

मुलुंड पश्चिम येथील झवेर मार्गावर असलेल्या गाइड या स्टेट बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज को. ऑप. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी इमारतीत राहणाऱ्या सावला कुटुंबातील मणिबेन या बरेच दिवसांपासून दिसत नसल्याचे सामाजिक कार्यकत्रे विरल शहा यांना सांगितले. घरातून दरुगधी येऊ लागल्याने काही तरी विपरीत घडले असावे, या विचाराने शहा यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. परंतु घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना घरभर कचरा साचल्याचे दिसून आले. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा कचरा बाहेर काढण्यात आला. तेव्हा तब्बल चार ट्रक आणि सहा टेम्पो भरून कचरा निघाला. याच कचऱ्यात राहणाऱ्या ८६ वर्षीय मणिबेन सावला यांना बाहेर काढून उपचारासाठी एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गाइड इमारतीत एकूण बारा सदनिकाधारक आहेत. तळमजल्यावर चुनीलाल सावला यांचे कुटुंब राहते. एकूण तीन मुलगे, तीन मुली आणि त्यांची पत्नी मणिबेन असा त्यांचा परिवार. काही वर्षांपूर्वीच चुनीलाल यांचे, एक मुलगी आणि मुलाचे निधन झाले. उरलेली चारही भावंडे वयाची साठी पार केलेली आहेत. या सर्वानाच घरात कचऱ्याचा संग्रह करण्याचा विक्षिप्त छंद जडला. त्यामुळे ते घरात कचरा साठवू लागले.

त्यांच्या या वृत्तीचा आसपासच्या रहिवाशांना त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परंतु पदाधिकाऱ्यांच्या सूचनेलाही या कुटुंबाने जुमानले नाही, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष चिराग गांधी यांनी दिली. अखेर हे प्रकरण पोलिसांकडे नेण्यात आले. तेव्हा या कचराभूमीचा उलगडा झाला.

खाण्याचे पदार्थ, भंगार, चिंध्या

पोलिसांनी बेडरूमचे ग्रिल तोडून कचरा बाहेर काढून मणिबेन यांची सुटका केली. परंतु, घराच्या हॉल आणि स्वयंपाकघरात अद्याप बराच कचरा पडून आहे. या कुटुंबाने गेल्या १३ वर्षांपासून जमेल तो कचरा साठवून ठेवला. त्यात प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून गॅस सिलेंडपर्यंत असंख्य गोष्टींचा समावेश आहे. खाल्ल्यानंतर उरलेले पदार्थही येथेच टाकण्यात येत होते. अशा वातावरणातच हे कुटुंब राहात होते. या भावंडांची आई वृद्ध असल्याने तिला बेडरूममध्ये ठेवण्यात आले होते. तेथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातच ती राहात होती. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा ही भावंडे येथून दुसरीकडे राहायला गेली असल्याचेही उघड झाले. विशेष म्हणजे या सावला कुटुंबाच्या मुलुंडमधील देढिया निवास येथेही दोन-तीन खोल्या असल्याचे सांगण्यात आले