मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दहिसर ते आरे अशा २०.७३ किमी लांबीची मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाली. पहिल्याच दिवसापासून ही मार्गिका मुंबईकरांच्या पसंतीस पडली असून प्रवाशांनी या मार्गिकेला चांगला प्रतिसाद दिला आहे. व्यावसायिकदृष्टय़ा सेवेत दाखल झालेल्या या टप्प्यावर पहिल्याच दिवशी १३५ फेऱ्यांमधून ५५ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. यातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) ११ लाख रुपये महसूल मिळाला.
‘मेट्रो २ अ’मधील (दहिसर ते डी.एन.नगर) डहाणूकरवाडी ते आरे आणि ‘मेट्रो ७’मधील (दहिसर ते अंधेरी) दहिसर ते आरे अशा पहिल्या टप्प्याचे लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर रात्री ८ ते १० या वेळेत मेट्रो प्रवासी वाहतूक सेवेत दाखल झाली. पहिला दिवस आणि गुढीपाडव्याचा मुहूर्त असल्याने एमएमआरडीएने आंनदयात्राह्ण (जॉय राइड) म्हणून मुंबईकरांना मोफत प्रवासाची मुभा दिली. नवीन मेट्रोतून प्रवास करण्यासाठी अनेक जण पहिल्या टप्प्यातील मेट्रो स्थानकावर दाखल झाले होते. पहिल्या सफरीची उत्सुकता असतानाच मोफत प्रवासाची मुभा मिळाल्याने प्रवाशांचा आनंद द्विगुणित झाला. मोफत प्रवासाची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि मेट्रो स्थानकात गर्दी वाढत गेली.

शनिवारी, पहिल्या दोन तासांत २० हजार प्रवास केल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. शनिवारी सर्वच वयोगटांतील प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. हेच चित्र रविवारीही कायम होते.
रविवारी सकाळी सहा वाजता मेट्रो सेवा सुरू झाली. सुट्टीचा दिवस असल्याने केवळ मेट्रो सफरीचा आंनद घेण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडले होते. कुणी कुटुंबासमवेत, तर कुणी मित्रपरिवारासमवेत मेट्रोने प्रवास केला. रविवारी २०.७३ किमी लांबीच्या मार्गावर मेट्रोच्या १३४ फेऱ्या झाल्या. संपूर्ण दिवसात ५५ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. तिकीट विक्रीतून एमएमआरडीएला पहिल्या दिवशी ११ लाखांचा महसूल मिळाल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली. ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मुंबईकरांसाठी वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा पर्याय ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुट्टीच्या दिवशी प्रवासी संख्येत घट
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिका सेवेत दाखल होऊन आता आठ वर्षे होत आली. ११.४० किमीच्या या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजघडीला सोमवार ते शुक्रवारदरम्यान दिवसाला अडीच लाखांहून अधिक प्रवासी मेट्रो १ मधून प्रवास करतात. शनिवारी मात्र ही संख्या सव्वा लाखांवर येते आणि रविवारी एक लाखापेक्षा कमी प्रवासी मेट्रो १ मधून प्रवास करतात. याअनुषंगाने नव्या मेट्रो मार्गिकेला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असल्याचे म्हटले जात आहे.
लवकरच दिवसाला तीन-साडेतीन लाख प्रवासी?
रविवार सुट्टीच्या दिवशी ५५ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोच्या या टप्प्याला मुंबईकर नेमका कसा प्रतिसाद देतात हे येणाऱ्या काळात कळेल. एमएमआरडीएच्या अभ्यासानुसार या मार्गिकेवरून दिवसाला तीन ते साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. त्यामुळे नोकरदार दैनंदिन दहिसर ते आरे प्रवास करणारे मुंबईकर या टप्प्याला प्रतिसाद देतात का हे येत्या काळात स्पष्ट होईल.