मुंबई, पुणे : करोनाच्या जागतिक महासाथीसाठी लागू केलेले सर्व निर्बंध संपूर्णपणे मागे घेण्यात आल्यानंतर प्रथमच भीतीमुक्त वातावरणात साजरा होऊ घातलेला गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आल्याने राज्यभरातील बाजारांत शनिवारी खरेदीसाठी झुंबड उडाली. पावसाची उघडीप, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि आठवडय़ाचा अखेरचा दिवस हा दुर्मीळ योग गणेशभक्तांनी खरेदीच्या सार्थकी लावला.   

मुंबई-पुण्यासह राज्यातील अन्य शहरांच्या बाजारांतील खरेदीसाठी झालेल्या गर्दीची दृश्ये करोनाच्या भीतीचे मळभ सरल्याचे दर्शवत होती. आठवडय़ाचा अखेरचा दिवस असल्याने बाजार दिवसभर तुडुंब होते. मखरे, सजावट साहित्य, रोषणाईची उपकरणे आदींच्या खरेदीसाठी गणेशभक्त मोटारी घेऊन बाजारात दाखल आल्याने प्रमुख रस्त्यांबरोबरच गल्ली-बोळांतही वाहतुकीची कोंडी झाली. पुण्यात मंडई, तुळशीबाग परिसर, तर मुंबईत दादर, मशीद बंदर, काळबादेवी भाग गर्दीने फुलला होता.

Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

अधूनमधून पडणाऱ्या सरींचा अपवाद सोडला तर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्याच्या काही भागांत पावसाचा प्रभाव ओसरला असून दिवसभर सूर्यप्रकाश आहे. स्वच्छ, उत्साही वातावरणानेही गणेशोत्सव खरेदीतील आनंद द्विगुणीत केला आहे.             

पुण्यात मंडई, तुळशीबाग परिसरात शहर आणि उपनगरातून नागरिक मोठय़ा संख्येने खरेदीसाठी आल्याने मध्यभागात वाहतूक कोंडी झाली. गणेशोत्सव बुधवार, ३१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे सजावट आणि पूजा साहित्याच्या खरेदीसाठी मंडई आणि तुळशीबाग परिसर गर्दीने फुलला होता.  

पुण्याच्या मध्यभागात खरेदीसाठी अनेक जण मोटारीतून आल्याने वाहतूक कोंडी झाली. अनेक जण वाहनांच्या रांगांमध्ये अडकून पडले. काही वाहतूक विस्कळीत झाली. मंडई परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता तसेच मध्यभागातील गल्लीबोळांमध्येही वाहनांचा खोळंबा झाल्याचे चित्र होते.

रविवार पेठेतील कापडगंज, बोहरी आळी परिसरात सजावट साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. मंडई परिसरातील वाहनतळावर मोटारी लावण्यास जागाच नसल्याने अनेकांनी नदीपात्रातील रस्त्यावर वाहने उभी केली. सदाशिव पेठ, नारायण पेठेतील गल्ली बोळात बेशिस्तपणे दुचाकी लावण्यात आल्याने गल्लीबोळातील वाहतूक विस्कळीत झाली. तसेच, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्त्यावरीलही वाहतूक खोळंबली. 

पोलिसांची घातपातविरोधी तपासणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात घातपात विरोधी तपासणी केली. बॉम्बशोधक-नाशक पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रंगीत तालीम घेतली. त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील वाहतूक शनिवारी दुपारी काही काळ विस्कळीत झाली.

गौरीपूजन कधी?

गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर गृहिणींना गौरी आगमनाचे वेध लागतात. शनिवारी (३ सप्टेंबर) अनुराधा नक्षत्र दिवसभर असल्याने दिवसभरात आपल्या सवडीनुसार केव्हाही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे, असे संकेत असल्याने रविवारी (४ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे. सोमवारी (५ सप्टेंबर) मूळ नक्षत्रावर रात्री ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत केव्हाही गौरी आणि गणपतीचे विसर्जन करता येईल.

प्रतिष्ठापना केव्हा करावी?

’भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, बुधवारी, ३१ ऑगस्ट या दिवशी पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४ वाजून ४८ मिनिटे ते दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत प्रत्येकाला आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल.

’त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वज्र्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मध्यान्हानंतर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले.

पुढील वर्षी १९ सप्टेंबरला आगमन :  यंदा अनंत चतुर्दशी शुक्रवारी, ९ सप्टेंबरला आहे. दहा दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन या दिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल. पुढील वर्षी १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे, असे ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले.

कोकणाकडे एसटीने दीड लाख गणेशभक्त रवाना

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक आहे. सुमारे दीड लाखांहून अधिक गणेशभक्त कोकणात रवाना होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने शनिवारी दिली. एसटी गाडय़ांची मागणी यावेळी वाढली असून आज, रविवारी १२४१ हून अधिक बस कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत.